शिरोळ तालुक्याला कोरोनाची मगरमिठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:24 IST2021-05-09T04:24:46+5:302021-05-09T04:24:46+5:30
आतापर्यंत १,९०९ रुग्णांची नोंद संदीप बावचे जयसिंगपूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, संचारबंदीच्या काळात शिरोळ ...

शिरोळ तालुक्याला कोरोनाची मगरमिठी
आतापर्यंत १,९०९ रुग्णांची नोंद
संदीप बावचे
जयसिंगपूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, संचारबंदीच्या काळात शिरोळ तालुक्यातील रुग्णसंख्या बाराशेवर पोहोचली आहे. कडक निर्बंध लागू होऊनही रुग्णसंख्या कमी झालेली नाही. त्यामुळे शिरोळ तालुक्यात चिंता वाढली आहे. एप्रिल महिन्यात ग्रामीण भागात ५९१, तर मेच्या पहिल्या आठवड्यात आणखी ८५७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाची मगरमिठी ग्रामीण भागात थांबायला तयार नाही, असेच चित्र सध्यातरी दिसत आहे.
शहराबरोबर ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढत चालली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एप्रिलपासून शिरोळ तालुक्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला होता. एक महिन्यात ८६४ रुग्णांची नोंद झाली होती. यामध्ये शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड परिसरात २७३, तर तालुक्यातील ५२ गावांत ५९१ रुग्णांची नोंद झाली आहे, तर २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यूदेखील झाला आहे. संचारबंदी लागू केल्यामुळे रुग्णसंख्या कमी होईल, अशी आशा होती.
मात्र, मेच्या पहिल्या आठवड्यात ही संख्या वाढत चालली आहे. ७ मेअखेर शहरी व ग्रामीण भागात १,०५२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर शुक्रवारी १४८ रुग्ण वाढले आहेत. दररोज रुग्णांची भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. गंभीर रुग्णांची संख्या वाढल्यामुळे ऑक्सिजन, रेमडेसिविर अपुरे पडू लागले आहेत. नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. सध्यातरी रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. रुग्ण बरे होत असलेतरी प्रशासनाने आणखी कडक नियम करण्याची गरज आहे.
------------------------------
चौकट - ७ दिवसांत दुप्पट रुग्ण
गेल्या एप्रिल महिन्यात ८६४ रुग्णांची नोंद झाली होती; परंतु ७ मेअखेर रुग्णसंख्या वाढून ती १,९०९ वर पोहोचली आहे, तर दोन दिवसांत तब्बल २५६ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनासमोर ही चिंतेची बाब ठरत आहे.