सहकारामुळे सहजीवन समृद्ध
By Admin | Updated: July 23, 2015 00:12 IST2015-07-22T23:37:10+5:302015-07-23T00:12:54+5:30
नीता मगदूम : एस. आर. पाटील यांच्या पुण्यतिथिनिमित्त आयोजित व्याख्यान

सहकारामुळे सहजीवन समृद्ध
कोल्हापूर : सहकाराच्या माध्यमातून सुरू झालेल्या दूध संस्थांमुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक व्यवहार करता आले, त्यांचा आत्मविश्वास वाढला. सहकारामुळेच सहजीवनाची परिभाषा बदलून ते समृद्ध झाले, असे मत अॅड. नीता मगदूम यांनी केले.
रयत सेवा कृषिउद्योग सहकारी संघ आणि एस. आर. पाटील विकास ट्रस्टतर्फे सहकार शिरोमणी एस. आर. पाटील यांच्या १३व्या पुण्यतिथिनिमित्त येथील शाहू स्मारक भवनात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. ‘सहकारातून फुलले सहजीवन’ हा व्याख्यानाचा विषय होता. अॅड. मगदूम म्हणाल्या, सहकार हा गोरगरिबांच्या कष्टातून उभा राहिला आहे; पण सध्या सहकारात भ्रष्टाचाराचा शिरकाव होत आहे. श्रेयवादाच्या राजकारणात सहकार मोडीत काढण्याचे काम सुरू आहे. अशा प्रवृत्ती सहकाराला धोकादायक आहेत. गावगाड्यामधून सहकार निर्माण झालेला आहे. त्यामुळे सहकाराकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्याला निश्चित चांगले दिवस येतील, असा विश्वासही मगदूम यांनी व्यक्त केला.
मगदूम म्हणाल्या, एस. आर. पाटील यांनी वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून सहकार हा लोकजीवनाचा मार्ग आहे, हे दाखवून दिले. पाटील यांनी ‘शेतकरी भविष्य निर्वाह निधी’ ही योजना सुरू केली. ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील व अॅड. नीता मगदूम यांच्या हस्ते एस. आर. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघाचे अध्यक्ष आनंदराव यादव, एस. आर. पाटील विकास ट्रस्टच्या विश्वस्त अॅड. मंगला पाटील-बडदारे, खजानीस चिंतामण गुरव, विश्वस्त पी. डी. पाटील, बाबासो पाटील-भुयेकर, नामदेव कांबळे, ऊर्मिला पाटील, जयश्री पाटील-चुयेकर, माधुरी जाधव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)