गुजरातच्या धर्तीवरील ‘कन्व्हेंशनल सेंटर’ रखडल
By Admin | Updated: November 28, 2014 00:33 IST2014-11-28T00:23:09+5:302014-11-28T00:33:40+5:30
शासनाकडून मान्यता : निधी मिळेना; इंजिनिअरिंग असोसिएशन, शिवाजी विद्यापीठाची दमछाके

गुजरातच्या धर्तीवरील ‘कन्व्हेंशनल सेंटर’ रखडल
संतोष मिठारी - कोल्हापूर -उद्योजकीय संघटनेचा पुढाकार, आरक्षित केलेली पाच एकर जागा, तयार असलेला प्रस्ताव, तत्कालीन मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळूनदेखील शिवाजी विद्यापीठातील कन्व्हेंशनल आणि एक्झिबिशन सेंटरचा (प्रदर्शन व व्यापारी केंद्र) प्रकल्प निधीअभावी गेल्या तीन वर्षांपासून रखडला आहे. सेंटरचा प्रस्ताव व निधी देण्यास राज्य शासनाकडून मान्यता मिळाली. मात्र, प्रत्यक्षात विद्यापीठाला निधी देण्यासाठी शासनाला मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे.
गुजरात विद्यापीठाच्या धर्तीवर औद्योगिक प्रदर्शनासाठी शिवाजी विद्यापीठात कायमस्वरूपी कन्व्हेंशनल व एक्झिबिशन सेंटर सुरू करण्याची मागणी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या नेतृत्वाखाली उद्योजकांनी विद्यापीठाकडे केली. त्याबाबत एप्रिल २०१२ मध्ये कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठकीत सेंटरबाबत उद्योजकांशी चर्चा केली. यात त्यांनी सेंटरसाठी लागणारा निधी आणि विद्यापीठाकडे उपलब्ध असल्यास पाच एकर जागा देण्याचे आश्वासन दिले. त्यावर कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी इंजिनिअरिंग असोसिएशनचे पदाधिकारी व उद्योजकांची बैठक घेतली.
सुवर्णमहोत्सवी वर्षाची संधी साधत विद्यापीठाने या सेंटरचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. त्याला तत्त्वत: मान्यता देत शासनाने सुवर्णमहोत्सवी निधीअंतर्गत त्यासाठी दहा कोटींचा निधीदेखील देण्याचे मान्य केले. त्यावर टप्प्याटप्प्याने हे सेंटर विकसित करण्याचे ठरविण्यात आले. मात्र, निधी, प्रस्ताव तत्त्वत: मान्य होऊन तीन वर्षे उलटली, तरी अद्यापही सेंटरसाठी एक रुपयादेखील विद्यापीठाला मिळालेला नाही. निधी पदरात पाडून घेण्यासाठी विद्यापीठ प्रशासन, इंजिनिअरिंग असोसिएशनची पुरती दमछाक होत आहे. घोषणेची ग्वाही, प्रत्यक्षात मदत नाही, अशी या सेंटरबाबतची शासनाची भूमिका उद्योगवाढीला मारक ठरणारी आहे.
स्थानिक उद्योजकांना बळ मिळावे,
या उद्देशाने या कन्व्हेंशनल आणि एक्झिबिशन सेंटरचा प्रस्ताव मांडला; पण शासनाकडून निधीअभावी सेंटर रखडले. दर्जेदार, गुणवत्तापूर्ण उत्पादन बाजारपेठेत अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचविण्यासाठी हे सेंटर आवश्यक आहे. त्यामुळे त्याचे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आहे.
- रवींद्र तेंडुलकर, अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन
शिवाजी विद्यापीठाने सुवर्णमहोत्सवी वर्षासाठीच्या निधीच्या प्रस्तावातून पाठविलेला प्रकल्प, योजनांमध्ये या
कन्व्हेंशनल सेंटरचादेखील समावेश होता. मात्र, त्याला अद्यापही शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. निधी व मान्यता मिळविण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.
- कुलगुरू डॉ. एन. जे. पवार
असा होता प्रस्ताव...
सुमारे दोन हजार लोकांच्या क्षमतेचे सर्वसोयींनी युक्त अद्ययावत सभागृह, ५० हजार स्क्वेअर फुटांचे बांधकाम, प्रशस्त वाहनतळ, निवास आणि जेवणाची व्यवस्था, असा सेंटरच्या रचनेचा प्रस्ताव तयार आहे. विविध अभियंते आणि विद्यार्थ्यांची स्पर्धा घेऊन त्यांच्याकडून आलेल्या आराखड्यातून हा प्रस्ताव तयार केला. सेंटरसाठी विद्यापीठाच्या कॅम्पस्मधील युको बँकेच्या पलीकडील पाच एकर जागा आरक्षित केली आहे.