एकवटलेले शिक्षण क्षेत्र, पक्षीय जोडीमुळे आसगावकर यांचा विजयी सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:59 IST2020-12-05T04:59:35+5:302020-12-05T04:59:35+5:30

कोल्हापूर : पहिल्यांदा संधी मिळाली म्हणून एकवटलेले कोल्हापूरकर, महाविकास आघाडीच्या रूपाने मिळालेली पक्षीय ताकद आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी ...

Convenient education sector, Asgavkar's victory is easy due to party alliance | एकवटलेले शिक्षण क्षेत्र, पक्षीय जोडीमुळे आसगावकर यांचा विजयी सुकर

एकवटलेले शिक्षण क्षेत्र, पक्षीय जोडीमुळे आसगावकर यांचा विजयी सुकर

कोल्हापूर : पहिल्यांदा संधी मिळाली म्हणून एकवटलेले कोल्हापूरकर, महाविकास आघाडीच्या रूपाने मिळालेली पक्षीय ताकद आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी लावलेल्या जोडण्यांमुळे प्रा. जयंत आसगावकर यांचा विजय सुकर झाला. ‘आसगावकर हे शिक्षक नव्हे संस्थाचालक असल्या’चा प्रचार विरोधकांनी केला; मात्र तो मतदारांनी झिडकारला.

‘शिक्षक’मधून महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी डझनभर इच्छुक होते. मात्र कॉग्रेसची उमेदवारी मिळवण्यात प्रा. आसगावकर यांनी बाजी मारली. उमेदवारी मिळाली; मात्र विरोधकांचे बंड थंड करून कोल्हापुरातून एकच उमेदवार देण्याचे आव्हान होते. मंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांनी बंडोबांना शांत करीत आसगावकर यांच्यामागे बळ उभे केले. ‘शिक्षक’मधून पहिल्यांदा संधी मिळाल्याने कोल्हापुरातील संपूर्ण शिक्षण क्षेत्र एकवटल्याने मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. मतभेद विसरून सगळ्यांनी आसगावकर यांना पहिली पसंती दिली. त्यामुळेच त्यांना पहिल्या पसंतीची १६ हजार ८७४ मते मिळाली. त्यानंतर त्यांनी विजयापर्यंत मागे वळून पाहिले नाही.

‘रयत’ने आसगावकरांना तारले

रयत शिक्षण संस्थेने या वेळेला पहिल्यांदाच उघड पाठिंबा दिला होता. त्यांची सात हजार मते आहेत. त्यांतील बहुतांश पहिल्या पसंतीची मते घेण्यात प्रा. आसगावकर यशस्वी झाले. दत्तात्रय सावंत हे पहिल्या फेरीपासून आसगावकर यांचा पाठलाग करीत होते. एकूणच परिस्थिती पाहता, आसगावकर यांना ‘रयत’ने तारल्याची चर्चा सुरू आहे.

विजय खेचून आणण्यात विरोधकांची साथ

जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राशी निगडित ‘कोजिमाशि’, मुख्याध्यापक संघ, आदी संस्थांच्या राजकारणात आमदार आसगावकर यांचे विरोधक आहेत. दादासाहेब लाड, बाबासाहेब पाटील यांनी तर निवडणुकीत अर्ज दाखल करून आव्हान दिले होते. मात्र पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांनी समझोता केला. लाड, पाटील यांनी नुसता पाठिंबा दिला नाही; तर प्रचारात सक्रिय होऊन विजय खेचून आणण्यात मोलाची साथ दिली.

सांगरूळ शिक्षण संस्थेचे कर्मचारी राबले

उमेदवारी अर्ज भरल्यापासून सांगरूळ शिक्षण संस्थेचे कर्मचारी विविध जिल्ह्यांत तळ ठाेकून हाेते. प्रत्येक शिक्षकाची भेट घेण्याबरोबरच विरोधकांच्या काय हालचाली आहेत, यावर ते नजर ठेवून होते.

दत्तात्रय सावंत यांची शेवटपर्यंत झुंज

दत्तात्रय सावंत यांनी सहा वर्षांत शाळांना संगणक, विज्ञान पेटी, प्रोजेक्टर, आदी साहित्य दिले होते. संपर्काच्या पातळीवर ते पुढे राहिल्याने अपक्ष असूनही त्यांनी चांगली टक्कर दिली.

आसगावकर यांच्या विजयाची कारणे-

कोल्हापूरची अस्मिता जागी करण्यात आसगावकरांना यश

‘रयत’सह डी. वाय. पाटील ग्रुप, भारती विद्यापीठाची मिळालेली ताकद

स्थानिक विरोधकांचे बंड शांत करीत प्रचारात सक्रिय केले.

- राजाराम लोंंढे

Web Title: Convenient education sector, Asgavkar's victory is easy due to party alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.