सावर्डे परिसरात पावसाची संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST2021-05-17T04:22:29+5:302021-05-17T04:22:29+5:30
सावर्डे (ता. पन्हाळा) परिसरात सकाळी सहा वाजल्यापासून जोरदार वाऱ्यासह पावसाची संततधार सुरू आहे. या पावसाने शिवारात पाणीच पाणी झाल्याने ...

सावर्डे परिसरात पावसाची संततधार
सावर्डे (ता. पन्हाळा) परिसरात सकाळी सहा वाजल्यापासून जोरदार वाऱ्यासह पावसाची संततधार सुरू आहे. या पावसाने शिवारात पाणीच पाणी झाल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत.
मागील दहा-बारा दिवसांत या परिसरात सलग तीन दिवस जोरदार वळीव पावसाने झोडपले होते. आज सकाळी सहा वाजल्यापासून जोरदार वाऱ्यासह पावसाची एकसारखी सुरुवात आहे. या पावसाने काढणीयोग्य आलेली उन्हाळी भात, मका , सूर्यफूल , भुईमूग यांच्यासह भाजीपाला पिकांच्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे .
हातातोंडाशी आलेली पिके पावसात अडकल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. आज सकाळपासून ढगाळ वातावरण व पावसाची संततधार असल्याने पावसाळा सुरू झाला का काय, असे वाटत होते.
या पावसाने हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे.
पाऊस अशाच तीन- चार दिवस राहिल्यास काढणीयोग्य पिकांना मोड येऊन शेतकऱ्यांना प्रचंढ नुकसान सोसावे लागणार आहे. पावसाने वाफ्यात तुंबलेले पाणी शेतकरी बाहेर काढून पीक सुरक्षित राहील यासाठी धडपड करताना दिसत आहे. सावर्डे, मल्हारपेठ, मोरेवाडी , वाघुर्डे , सुळे आदी परिसरात पावसाची संततधार कायम आहे.