वंचित कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू

By Admin | Updated: August 9, 2014 00:31 IST2014-08-08T23:26:27+5:302014-08-09T00:31:56+5:30

अन्नसुरक्षा योजना : इचलकरंजीत सदोष लाभार्थी यादीमुळे धान्याचे गौडबंगाल

Continuing survey of disadvantaged families | वंचित कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू

वंचित कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू

इचलकरंजी : सरकारच्या अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित राहिलेल्या शहरातील हजारो लाभार्थी कुटुंबीयांचे सर्वेक्षण शहर कॉँग्रेस समितीने सुरू केले आहे. अनेक भागांतून होणाऱ्या सर्वेक्षणामध्ये लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्याचे काम चालू आहे; पण गेली सहा महिने येथील रास्त भावाच्या धान्य दुकानांतून सदोष यादीप्रमाणे दिलेल्या धान्याचे गौडबंगाल उघडकीस आणण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.
अन्नसुरक्षा योजनेंतर्गत फेब्रुवारीमध्ये लाभार्थ्यांची यादी करण्यात आली; पण जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मार्च महिन्यामध्ये पुन्हा फेर यादी केली. ही यादी करताना पुरवठा अधिकारी कार्यालयाकडील कर्मचाऱ्यांऐवजी लाभार्थ्यांच्या यादीची जबाबदारी संबंधित दुकानदारांकडेच देण्यात आली होती; पण बहुतांश दुकानदारांनी शिधापत्रिकांवरील धान्य न उचलणाऱ्या अनेकांची नावे यादीत घुसडली. ज्यामुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये सुमारे ३० टक्के धान्याचा अपहार झाला असावा, अशी नागरिकांत चर्चा आहे.
दरम्यानच्या काळात फेब्रुवारी महिन्यातच केसरी शिधापत्रिकांवर सन २०१३ प्रमाणे धान्य द्यावे, असे शासनाकडून आदेश आले. त्यापाठोपाठ फेर आदेश काढण्यात आला आणि सन १९११ प्रमाणे धान्य देण्याचे सुचविण्यात आले. या गोंधळामध्ये प्रत्यक्ष २५ टक्के लाभार्थ्यांना मात्र धान्य मिळालेच नाही. त्याचा परिणाम म्हणून शहरातील विविध राजकीय पक्ष व संघटनांनी आंदोलने करून जोरदार आक्षेप घेतला. शहरातील शहर कॉँग्रेसनेही याबाबत सातत्याने पाठपुरावा करून लाभार्थ्यांची यादी मिळविली आणि यादी सदोष असल्याचे वस्तुस्थिती समोर आली. म्हणूनच शहर कॉँग्रेसच्यावतीने प्रत्यक्ष लाभार्थ्यांना धान्य मिळावे, यादृष्टीने सध्याचे सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती शहर अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी दिली. सर्वेक्षणाची सुरुवात नगरसेवक संजय केंगार, भरत देसाई, दशरथ मोहिते, बापूसाहेब घुले, आदींनी सहकारनगर परिसरातून केली आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी सुमारे २५० नागरिकांचे अर्ज भरून घेतले. शहरातील प्रत्येक वॉर्डामध्ये अन्नसुरक्षा योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करणे सुरू असून, नागरिकांनी त्यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कॉँग्रेसच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Continuing survey of disadvantaged families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.