यंत्रमाग संस्थांची चौकशी सुरू
By Admin | Updated: March 12, 2015 23:50 IST2015-03-12T23:28:32+5:302015-03-12T23:50:51+5:30
इचलकरंजीत खळबळ : पथक दाखल; अहवाल शासनास देणार

यंत्रमाग संस्थांची चौकशी सुरू
इचलकरंजी : राज्य शासनाच्या हमीने राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून अर्थसाह्य घेणाऱ्या यंत्रमाग सहकारी संस्थांची चौकशी चालू झाल्याने येथील वस्त्रोद्योगात मोठी खळबळ उडाली आहे. वस्त्रोद्योग संचालकांच्या आदेशाने ही चौकशी सुरू झाली असून, गुरुवारी सात अधिकाऱ्यांचे पथक येथे दाखल झाले.सन १९९६-९७ मध्ये शिवसेना-भाजपचे युती शासन सत्तेवर असताना वस्त्रोद्योगामध्ये सहकारी संस्था स्थापन झाल्या. त्यामध्ये यंत्रमाग सहकारी संस्थांची संख्या लक्षणीय होती. त्यानंतर यंत्रमाग सहकारी संस्था स्थापन करण्याचे पेव फुटले. यंत्रमागांशिवाय सायझिंग, प्रोसेसिंग, आदी घटक उद्योगांमध्येसुद्धा सहकारी संस्था स्थापन झाल्या. सहकारी संस्थांचे प्रकल्प अहवाल तयार करून त्याला शासकीय मंजुरी मिळविणारे एजंटही त्यावेळी निर्माण झाले होते. शासनाकडे प्रगतीचा बोगस अहवाल देऊन शासकीय भागभांडवल व राष्ट्रीय सहकारी विकास निगम (नवी दिल्ली)कडून अर्थसाह्य मिळविणारे काही संस्थाचालकसुद्धा नंतर तयार झाले. याबाबतचे काही प्रकार निदर्शनात आल्याने सध्याची चौकशी सुरू झाल्याचे खात्रीचे वृत्त आहे.राज्यात वस्त्रोद्योगाच्या एकूण ४२१ सहकारी संस्था आहेत. इचलकरंजी परिसरात असणाऱ्या संस्थांची संख्या सुमारे २२५ आहे. यातील सुमारे वीसहून अधिक संस्थांनी शासकीय भागभांडवल व राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे अर्थसाह्य उचलले आहे; पण प्रत्यक्षात जागेवर कारखान्याची यंत्रसामग्री किंवा इमारतसुद्धा नसल्याची माहिती शासकीय यंत्रणेला समजली. तसेच काही संस्थांचे चालक अर्थसाह्यापोटी दिलेले परतफेडीचे हप्ते भरत नसल्याचेही निदर्शनात आले आहे.
शासनाच्या माहितीनुसार, खालील सहकारी संस्थांचा कारभार संशयास्पद असल्याची माहिती पथकातील एका अधिकाऱ्याने दिली. तेरणा यंत्रमाग सहकारी संस्था, तिरूमलाई, ओमसाई मल्हार, वीरभद्र, श्री व्यंकटेश बालाजी, ताराराणी महिला, वरदविनायक (यड्राव), वीर सावरकर (घोसरवाड), अंबाबाई, पायोनियर (कोरोची), स्वामी समर्थ (तारदाळ), श्रीकृष्ण (या संस्था इचलकरंजी परिसरातील आहेत), छत्रपती ताराराणी (आर्दाळ-आजरा), वैभवलक्ष्मी (खेड-आजरा), गुरुदेवदत्त, धनलक्ष्मी महिला (मिरज) या सर्व संस्था यंत्रमाग किंवा स्वयंचलित मागांच्या आहेत. याशिवाय श्री पंत प्रोसेसर्स (५.५ कोटी रुपये) व नवरंग प्रोसेसर्स (३.५ कोटी रुपये) या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या संस्थांचा चौकशीत समावेश आहे. (प्रतिनिधी)