हातकणंगलेत ‘सहकारी’त जोडण्या सुरू

By Admin | Updated: November 19, 2014 23:19 IST2014-11-19T23:16:31+5:302014-11-19T23:19:10+5:30

८१६ सहकारी संस्था : क आणि ड वर्गातील निवडणुका डिसेंबरपूर्वी घेण्याचा आदेश

Continue to join 'Sahakari' in Hathkangal | हातकणंगलेत ‘सहकारी’त जोडण्या सुरू

हातकणंगलेत ‘सहकारी’त जोडण्या सुरू

दत्ता बिडकर - हातकणंगले तालुक्यातील ८१६ क आणि ड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून सुरू झाली आहे. सहकारी प्राधिकरणाकडून क आणि ड वर्गातील निवडणुका डिसेंबरपूर्वी घेण्याचा आदेशामुळे कार्यालयाकडील कर्मचारी, शासन पॅनलवरील लेखापरीक्षक, कायदेतज्ज्ञ आणि चार्टर्ड अकौंटंट यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
तालुक्यामध्ये ७२५ क वर्गातील संस्था असून, यामध्ये यंत्रमाग, औद्योगिक, सहकारी संस्था, दहा लाखांपर्यंतचे भागभांडवल असलेल्या पतसंस्था, कृषिपूरक संस्था, प्रक्रिया, पणन, हातमाग संस्था, शासकीय अर्थसाहाय्य घेतलेले नाही अशा औद्योगिक वसाहती, औद्योगिक संस्था, ग्राहक, कुक्कुटपालन संस्था, २०० पेक्षा जादा सभासद संख्या असलेल्या पाणीपुरवठा व पाणी वापर संस्था यांचा समावेश आहे.
ड वर्गामध्ये ९१ संस्था असून, वर्चस्वासाठी या संस्थांचे कारभारी कामाला लागले आहेत. ड वर्गवारीमध्ये २०० पेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या संस्थांचा समावेश असल्यामुळे स्थानिक पातळीवर छोट्या छोट्या संस्था कोणत्याही संघर्षाशिवाय गुपचूप निवडणूक पार पडण्यासाठी धडपडत आहेत.
निवडणूक प्राधिकरणाच्या आचारसंहितेनुसार निवडणुका पार पडणार असून, निवडणूक प्रक्रिया मंजुरीसाठी स्थानिक पातळीवर विशेष सर्वसाधारण सभेचे नियोजन करून निवडणुकीची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. २००पेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या बहुसंख्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध पार पडण्याची शक्यता आहे. २०० पेक्षा जास्त सभासद असलेल्या ठिकाणी मात्र सत्तेसाठी संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गटातटाच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.


‘ढपल्या’ची शक्यता
उपनिबंधकांनी आपल्या मर्जीतील लेखापरीक्षक, चार्टर्ड अकौंटंट अािण कायदेतज्ज्ञ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त केले आहेत. संस्थांच्या वार्षिक उलाढालीवर तसेच बिनविरोध होणाऱ्या संस्थांबाबत सहकारामध्ये पुन्हा ढपला संस्कृती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


७५०० रुपये करप्रणाली
तालुक्यातील क आणि ड वर्गात असणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी शासनाने ७५०० रुपये करप्रणाली आकारली आहे. कर रक्कम चलनाद्वारे शासनाच्या तिजोरीमध्ये भरणा केल्याशिवाय निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Web Title: Continue to join 'Sahakari' in Hathkangal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.