प्रलंबित मागण्यांबाबत पाठपुरावा सुरू ठेवा
By Admin | Updated: November 15, 2014 00:14 IST2014-11-15T00:12:42+5:302014-11-15T00:14:34+5:30
प्रवीण दराडे यांच्याकडून अधिकाऱ्यांना सूचना

प्रलंबित मागण्यांबाबत पाठपुरावा सुरू ठेवा
कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्यांचा पाठपुरावा सुरू ठेवा, ज्या ठिकाणी माझी आवश्यकता असेल, त्या ठिकाणी मी निश्चित मदत करीन, अशा सूचना सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांनी आज, शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
दराडे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या स्तरावरील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आपण कोल्हापुरात आलो. झालेल्या बैठकीत सर्व प्रश्नांची सूक्ष्म माहिती घेण्यात आली आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या स्तरावरील प्रलंबित असणारा विमानतळाचा प्रश्न आहे. त्याच्या सद्य:स्थितीबाबत माहिती घेतली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाणार आहे. या सरकारकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शिस्त व पारदर्शकपणा यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भर आहे. त्यासाठी त्यांनी विभागनिहाय बैठका घेण्याचे निश्चित केले आहे. त्याची सुरुवात नागपूर येथून झाली आहे. त्यानंतर आता विभागनिहाय बैठका घेऊन मुख्यमंत्री विविध प्रश्नांचा आढावा घेणार आहेत.
जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत झालेल्या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल. या प्रश्नांबाबत राज्यस्तरावर निश्चित मार्ग निघेल. कोल्हापूर-कोकण रेल्वेबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली नसली तरी याबाबत मागणी आल्यास मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पुणे विभागाच्या बैठकीत यावर निश्चित चर्चा केली जाईल. (प्रतिनिधी)
नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बांधकामाची पाहणी
मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांनी बैठकीनंतर जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्यासमवेत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बांधकामाची पाहणी केली. कामाचा वेग व दर्जा पाहून त्यांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांचे कौतुक केले. त्यांनी संपूर्ण इमारतीच्या बांधकामाची फिरून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक, उपअभियंता दिलीप कल्याणकर, आदी उपस्थित होते.