बांधकाम कामगारांचा २३ फेब्रुवारीला मंत्रालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST2021-02-05T07:08:55+5:302021-02-05T07:08:55+5:30
कोल्हापूर : बांधकाम कामगारांची नोंदणी ऑनलाईनने नको, ऑफलाईननेच करावी यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील बांधकाम कामगारांचा २३ फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर ...

बांधकाम कामगारांचा २३ फेब्रुवारीला मंत्रालयावर मोर्चा
कोल्हापूर : बांधकाम कामगारांची नोंदणी ऑनलाईनने नको, ऑफलाईननेच करावी यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील बांधकाम कामगारांचा २३ फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कोल्हापुरात बांधकाम कामगारांच्या राज्यव्यापी मेळाव्यात घेण्यात आला. लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धारही यावेळी केला. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने शाहू स्मारक भवान येथे मेळावा झाला. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते मिश्रीलाल जाजू, समितीचे निमंत्रक कॉ. शंकर पुजारी, मुंबईतील कॉ. उदय चौधरी, कॉ. काशिनाथ नकाते, फेरीवाला संघटनेचे दिलीप पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिश्रीलाल जाजू म्हणाले, बांधकामावेळी घेण्यात येणाऱ्या १ टक्के करातून बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे १० हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. यामधूनच विविध योजना आणल्या. मात्र, शासनाने कामगारांसाठी स्वतंत्र असा काही निधी दिलेला नाही. त्यामध्येही कल्याण मंडळाकडून काही योजना बंद पाडल्या जात आहेत. १०० टक्के कामगारांची ऑनलाईनमुळे नोंदणी झालेली नाही. ऑफलाईननेच नोंदणी झाली पाहिजे. योजनेचा लाभ सर्वांच्या पदरात पडण्यासाठी राज्य शासनासोबत संघर्ष करावा लागेल.
शंकर पुजारी म्हणाले, राज्यात १७ लाखांपेक्षा जास्त बांधकाम कामगार होते. ऑनलाईन नोंदणीमुळे केवळ त्यांची संख्या ९ लाखांवर आली आहे. सर्वांनाच ऑनलाईन नोंदणी करणे शक्य नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच ऑफलाईनने नोंदणी सुरू झाली पाहिजे. कामगारमंत्र्यांनी अध्यादेश काढला नसल्यामुळे कामगारांच्या मुलींच्या विवाहासाठी ५१ हजार रुपये मिळत नाहीत. या सर्व मागण्यांसाठी आरपारची लढाई करावी लागणार आहे. पहिला टप्पा २३ फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर धडक मोर्चाचा असून लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे. यावेळी दिलीप पवार, गुणवंत नागटिळे, सुमन पुजारी, दयानंद कांबळे, संजय सुतार, ज्योतीराम मोरे, विजय बचाटे, संजय धुमाळ, रुपाली जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.
चौकट
बोगस नोंदणी, मग अधिकाऱ्यांवर कारवाई करा
बोगस नोंदणीमुळे अवजारे खरेदी करण्यासाठीची ५ हजार रुपयांची योजना बंद केली. कोण बोगस आहेत. नोंदणी कोणी केली अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केलेली नाही. आठ महिन्यांपासून योजना बंद केली. हे चुकीचे असून पुन्हा योजना सुरू झाली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात या विरोधात आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शंकर पुजारी यांनी दिला.
चौकट
सर्वांनाच मलाईदार खाती पाहिजेत
सर्वच आमदारांना मलईदार खाती पाहिजेत. कामगार मंत्रिपद घेण्यास फारसे कोणी इच्छुक नाहीत. यामुळेच मागण्यासंदर्भात सध्याच्या मंत्र्यांना भेटल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसून ते नाराजच वाटत आहेत. वास्तविक बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून त्यांना चांगले काम करून लोकांची सेवा करण्याची नामीसंधी असल्याचे मिश्रीलाल जाजू यांनी म्हटले.
चौकट
१० हजार कोटींवर डल्ला मारण्याचा डाव
कल्याणकारी मंडळाच्या योजनेतून देण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे. काही योजना बंद केल्या आहेत. राज्यशासनातील काहींचा करामधून जमा झालेल्या १० हजार कोटी रुपयांवर डल्ला मारण्याचा डाव असल्याचा आरोप के. पी. पाटील यांनी केला. आगामी निवडणुकीत त्यांना जागा दाखवून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
चौकट
मेळाव्यात करण्यात आलेले ठराव
बांधकाम कामगारांची नोंदणीची ऑनलाईन पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे ऑफलाईनने करणे.
नोंदणीसाठीचे १० लाखांपेक्षा जास्त प्रलंबित अर्ज मंजूर करणे.
बांधकाम कामगारांच्या मुलींच्या विवाहासाठी इतर राज्याप्रमाणे ५१ हजार रुपये देणे.
अवजारे घेण्यासाठी प्रत्येक पाच हजार रुपये देण्याची योजना पुन्हा सुरू करणे.
बांधकाम कामगारांना घरे बांधण्यासाठी २ लाख रुपये देणे.
फोटो : ०२०२२०२१ कोल बांधकाम कामगार न्यूज१
ओळी : कोल्हापुरात बांधकाम कामगारांचा मंगळवारी राज्यव्यापी मेळावा झाला. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते मिश्रीलाल जाजू यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शंकर पुजारी, उदय चौधरी, काशिनाथ नकाते, दिलीप पवार, संजय सुतार, सुमन पुजारी, संजय धुमाळ, रमेश जाधव, गुणवंत नागटिळे, के. पी. पाटील, आदी उपस्थित होते.
फोटो : ०२०२२०२१ कोल बांधकाम कामगार न्यूज२
कोल्हापुरात बांधकाम कामगारांचा मंगळवारी राज्यव्यापी मेळावा झाला. शंकर पुजारी यांनी मार्गदर्शन केले. ज्यावेळी येष्ठ कामगार नेते मिश्रीलाल जाजू, उदय चौधरी, काशिनाथ नकाते, दिलीप पवार, संजय सुतार, सुमन पुजारी, संजय धुमाळ, रमेश जाधव, गुणवंत नागटिळे, के.पी. पाटील, आदी उपस्थित होते.