शाहूवाडीत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी ट्रान्स्फॉर्मर उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:25 IST2021-05-07T04:25:50+5:302021-05-07T04:25:50+5:30
कोल्हापूर : महावितरणकडून मलकापूर ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला वीज जोडणीसाठी १०० के.व्ही.ए. क्षमतेच्या स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मरच्या उभारणीसाठीचे भूमिपूजन गुरुवारी ...

शाहूवाडीत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी ट्रान्स्फॉर्मर उभारणी
कोल्हापूर : महावितरणकडून मलकापूर ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला वीज जोडणीसाठी १०० के.व्ही.ए. क्षमतेच्या स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मरच्या उभारणीसाठीचे भूमिपूजन गुरुवारी कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांच्याहस्ते झाले.
जिल्ह्यात सात ठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात येणार असून शाहूवाडीला रोज १०० जंबो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. महावितरणच्या सकारात्मक भूमिकेमुळे शाहूवाडीतील पहिल्या ऑक्सिजन प्लॅन्टच्या प्रकल्पाची उभारणी वेगाने सुरू होत आहे. कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांनी त्यासाठी युध्दपातळीवर यंत्रणा उभी करून दिली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. सध्या जिल्ह्याला रोज पुरेल इतकाच अगदी काठावर ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सात ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट उभारण्यात येत आहे. शाहूवाडी येथील महावितरणचे काम साई इलेक्ट्रिकल्स या एजन्सीमार्फत केले जाणार आहे.
कोविड रुग्णालयांना मागणीप्रमाणे नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. त्यामुळे ज्या कामांसाठी इतरवेळी ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो, ती कामे महावितरणकडून दोन दिवसात पूर्ण केली जात आहेत. कोल्हापूर मंडलात अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. याप्रसंगी मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशुतोष तरळ, उपविभागीय अभियंता अभय शामराज, शाखा अभियंता निखिल काळोजी आदी उपस्थित होते.
--
फोटो नं ०६०५२०२१-कोल-शाहुवाडी एमएसईबी
ओळ :
मलकापूर ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या वीज जोडणीसाठी ट्रान्स्फॉर्मरच्या उभारणी कामाचे भूमिपूजन गुरुवारी कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी अन्य मान्यवर उपस्थित होते.