बांधकामाची गती, दर्जा तपासणीला खो
By Admin | Updated: November 20, 2014 00:01 IST2014-11-19T23:50:07+5:302014-11-20T00:01:34+5:30
विभागीय क्रीडासंकुल : आजची बैठक पुन्हा पुढे ढकलली

बांधकामाची गती, दर्जा तपासणीला खो
कोल्हापूर : सुधारित अंदाजपत्रकामुळे विभागीय क्रीडासंकुलाचे काम गेले काही महिने रेंगाळले आहे. त्याला गती देण्यासाठी व आतापर्यंत केलेल्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांनी उद्या, गुरुवारी यासंबंधी बैठक बोलावली होती. मात्र, विभागीय आयुक्तांच्या कार्यबाहुल्यामुळे पुन्हा ही बैठक पुढे ढकलली असल्याचे सूत्रांकडून समजते.
बैठक पुढे ढकलल्याने विभागीय क्रीडा कार्यालयाचे बांधकाम कधी पूर्ण होणार, असा सवाल कोल्हापूरवासीयांकडून विचारला जात आहे.
गेले सात महिने या ना त्या कारणांनी विभागीय क्रीडासंकुलाचे काम पूर्णपणे ठप्प आहे. प्रथम तांत्रिक अडचणी आणि सुधारित अंदाजपत्रकामुळे ठेकेदाराने वाढलेल्या बांधकाम साहित्याच्या दरामुळे काम करण्यास दाखविलेली असमर्थता यांसह एकूणच अनास्थेच्या कारभाराच्या कारणावरून दोन वर्षांपासून क्रीडासंकुलाचे काम रेंगाळले आहे. त्या कामास नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा या बैठकीतून होती. मात्र, पुन्हा एकदा विभागीय आयुक्तांच्या कार्यबाहुल्यामुळे या विभागीय क्रीडासंकुलाचे बांधकाम पूर्णत्वाकडे नेण्यास विलंब होत आहे.