बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे
By Admin | Updated: December 23, 2014 00:37 IST2014-12-23T00:37:42+5:302014-12-23T00:37:42+5:30
इचलकरंजी पालिका : पाणीपुरवठा सभापतिपदी रवी रजपुते, राष्ट्रवादीतील जांभळे, कारंडे गटात जोरदार वाद

बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे
इचलकरंजी : नगरपालिकेकडील विविध विषय समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे अनेक राजकीय घडामोडी घडल्या. नाट्यमय घडामोडीनंतर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बांधकाम समितीचे सभापतिपद भाऊसाहेब आवळे व पाणीपुरवठा समितीचे सभापतिपद रवी रजपुते यांना मिळाले. सत्तारूढ कॉँग्रेस आघाडीतील राष्ट्रवादी कॉँग्रेसअंतर्गत जांभळे व कारंडे गटांत जोरदार वाद झाला.
विविध विषय समित्यांची एक वर्षाची मुदत संपुष्टात आल्याने पालिकेकडील बांधकाम, पाणी, शिक्षण, आरोग्य व महिला-बालकल्याण या समित्यांची निवडणूक आज, सोमवारी झाली. निवडून आलेल्या ५७ नगरसेवकांसाठी या पाच समित्यांमध्ये प्रत्येकी पक्षीय बलाबलप्रमाणे कॉँग्रेस १०, राष्ट्रवादी ३ व शहर विकास आघाडीचे ६ अशा १९ नगरसेवकांचा समावेश करण्यात आला. सभापतिपदासाठी इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी ३ ते ३.३० वाजेपर्यंत दिली होती. मात्र, प्रत्येक समितीसाठी सत्तारूढांकडून एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला.
पालिकेच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीसाठी विरोधी शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक अनुपस्थित राहिले. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या कारंडे गटाच्या लतिफ गैबान, विठ्ठल चोपडे, शुभांगी माळी व माधुरी चव्हाण यांनीही सभेवर बहिष्कार टाकला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतिपदी भाऊसाहेब आवळे, पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी रवी रजपुते, शिक्षण, क्रीडा-सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापती म्हणून शोभा कांबळे, आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतिपदी सुजाता बोंगाळे, महिला व कल्याण समितीच्या सभापती म्हणून प्रमिला जावळे व उपसभापतिपदी पारूबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील कारंडे गटाला या निवडणुकीत स्थान मिळाले नसल्याने नगरपालिका आवारात आलेल्या नगरसेविका शुभांगी माळी व माधुरी चव्हाण यांनी नवनिर्वाचित सभापती आवळे यांना बोलावून घेतले. त्यांनी कारंडे गटाचा विचार न करता सभापतिपद स्वीकारल्याबद्दल त्यांना जाब विचारला. यावेळी या दोघींच्या पतीनीसुद्धा साथ दिली. आजच्या या घटनेने राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीचे दर्शन घडले. याच प्रकारची चर्चा आज नगरपालिका वर्तुळात जोरदारपणे होती. चोपडे सलग दोनदा वंचित
४राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विठ्ठल चोपडे हे पालिकेच्या कामकाजात सातत्याने विरोध करतात. त्याचा राग जांभळे गटावर आहे. त्यामुळे त्यांचाही समावेश कोणत्याही समितीत झाला नाही. सातत्याने दोनवेळा चोपडे यांना वंचित ठेवण्यात आले.
४याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद रवींद्र माने यांनी, चोपडे यांना कोणत्याही समितीत स्वारस्य नसल्याचे त्यांनीच सांगितल्याचे स्पष्ट केले; पण आपण माने यांना काहीही सांगितले नसल्याचे चोपडे म्हणाले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे पडसाद आजच्या पालिका विषय समित्यांच्या निवडणुकीत उमटले. विधानसभा निवडणुकीत ‘शविआ’ने कॉँग्रेसचे उमेदवार प्रकाश आवाडे यांना विरोध केला; पण या निवडणुकीत नगरसेवक मोहन कुंभार, नगरसेविका लक्ष्मी बडे व आक्काताई अवाळे यांनी कॉँग्रेसला पाठिंबा दिला. परिणामी या तिन्ही नगरसेवकांना कोणत्याही समितीत स्थान देण्यात आले नाही.
४महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रमिला जावळे या सलग तिसऱ्यांदा सभापती झाल्या. ही समिती आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने काहीशी दुर्लक्षित राहिली आहे.
४परिणामी या समितीचे सभापतिपद स्वीकारण्याचा दावा कुणीही केला नसल्याने जावळे यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडली, अशी पालिका वर्तुळात चर्चा होती.