निधीअभावी बांधकामाला ‘ब्रेक’?
By Admin | Updated: September 3, 2015 23:50 IST2015-09-03T23:50:55+5:302015-09-03T23:50:55+5:30
शिरोळ पंचायत समितीची इमारत : लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज

निधीअभावी बांधकामाला ‘ब्रेक’?
शिरोळ : तालुक्याचा आरसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळ पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला निधीअभावी ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सव्वादोन कोटी रुपयांपैकी एक कोटी वीस लाख रुपयांचाच निधी आतापर्यंत इमारत बांधकामासाठी मिळाला आहे. उर्वरित निधी लवकर मिळाला नाही, तर हे बांधकाम रखडणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास व्हावा, या दृष्टिकोनातून ५० वर्षांपूर्वी शासनाने विकासात्मक पाऊल पुढे टाकून तालुकास्तरावर पंचायत समित्या निर्माण केल्या. तालुक्यातील ५४ गावांतील नागरिक याठिकाणी कामानिमित्त येतात. कमी जागेत प्रशासकीय कामकाज सुरू असल्यामुळे काम करण्याला मर्यादा येत आहेत. वर्षानुवर्षे त्याच इमारतीत प्रशासनाचा कारभार सुरू असल्यामुळे पंचायत समिती चकाचक व सुसज्ज असाव्यात, या दृष्टिकोनातून प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन राज्यातील सर्व पंचायत समितींच्या इमारत बांधकामासाठी निधी मंजूर केला. त्याप्रमाणे शिरोळ पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीसाठी सव्वादोन कोटी रुपयांचा निधी तत्कालीन आघाडी सरकारने मंजूर केला होता. पहिल्या टप्प्यात एक कोटी २० लाखांचा निधी मिळाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बांधकामास सुरुवात झाली. उर्वरित निधी थकल्यामुळे सध्या इमारतीचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. हा निधी मिळाला नाही, तर इमारत बांधकाम अपूर्ण अवस्थेत राहणार आहे. निधीसाठी लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज बनली आहे. (प्रतिनिधी)
सुसूत्रता येणार
सध्या असलेली पंचायत समितीची प्रशासकीय
इमारत कामकाजासाठी अपुरी पडत आहे. नव्या सुसज्ज इमारतीमुळे प्रशासकीय
कामात सुसूत्रता येणार आहे. आमदार आणि खासदार असणाऱ्या शिरोळ गावातील या पंचायत समिती इमारत बांधकामाच्या निधीसाठी कोण पुढाकार घेणार, असाच प्रश्न उपस्थित होत आहे.