रांगणा किल्ल्याच्या संवर्धनाचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST2021-01-08T05:20:45+5:302021-01-08T05:20:45+5:30

कोल्हापूर : रांगणा किल्ले संवधर्नासाठी मी पाच कोटी रुपये मंजूर करून आणले होते. मात्र, पुरातत्व ...

Conservation work of Rangana fort is inferior | रांगणा किल्ल्याच्या संवर्धनाचे काम निकृष्ट

रांगणा किल्ल्याच्या संवर्धनाचे काम निकृष्ट

कोल्हापूर : रांगणा किल्ले संवधर्नासाठी मी पाच कोटी रुपये मंजूर करून आणले होते. मात्र, पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे संवर्धनाचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप खासदार संभाजीराजे यांनी केला आहे.

संभाजीराजे यांनी बुधवारी रांगणा किल्ल्यास भेट दिली व पाहणी केली. यावेळी शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी जीर्णोद्धार केलेल्या गडावरील रांगणाई देवीच्या मंदिरात त्यांनी देवीचे दर्शन घेतले.

किल्ल्याला भेट दिल्यानंतर संभाजीराजे म्हणाले, रांगणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आल्यापासून तो अखेरपर्यंत स्वराज्यात होता. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी मी स्वतः प्रयत्न करून पाच कोटी रुपये मंजूर करून आणले होते; पण पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या गडाचे संवर्धन निकृष्ट पद्धतीचे झालेले आहे. अधिकाऱ्यांनी या किल्ल्यास स्वतः भेट देणे आवश्यक आहे. या गडावर अनेक ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष आहेत. त्यामुळे या ठिकाणी उत्खनन होणे गरजेचे आहे. गडावरील अनेक तोफा खोल दरीमध्ये कोसळल्या आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना पुनर्स्थापित करण्याचे काम पुरातत्व विभागाने करणे अपेक्षित आहे.

गडाखाली दरीत पडलेल्या तोफा शोधणाऱ्या सर्व दुर्गप्रेमींचे अभिनंदन संभाजीराजे यांनी केले. यावेळी इतिहास अभ्यासक राम यादव, सचिन भांदिगरे, रविराज कदम, संग्राम पोफळे व दुर्गप्रेमी उपस्थित होते.

चौकट -

महाराजांचे नाव घेऊन राज्य करणाऱ्यांपेक्षा

यावेळी बोलताना संभाजीराजे यांनी राजकीय टोलाही लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त नाव घेऊन राज्य करणाऱ्या लोकांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत स्मारके असणाऱ्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या तरुणांचा सहवास मला भावतो, असा टोला त्यांनी लगावला.

०६०१२०२१ कोल रांगणा ०१

खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ल्याला भेट दिली.

Web Title: Conservation work of Rangana fort is inferior