खेबुडकरांमुळे जगण्यात चेतना
By Admin | Updated: July 29, 2014 00:03 IST2014-07-28T23:49:46+5:302014-07-29T00:03:18+5:30
सर्वांच्या भावना : चेतना संस्थेच्यावतीने खेबुडकर यांचा हृद्य सत्कार

खेबुडकरांमुळे जगण्यात चेतना
कोल्हापूर : अपंगमती व्यक्तींच्या जीवनात आनंद फुलवणारे, त्यांच्या श्रमाला मानसन्मान मिळवून देणारे, त्यांना स्वावलंबी बनवणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व असलेले प्राचार्य पवन खेबुडकर यांचा आज, सोमवारी सेवानिवृत्तिनिमित्त हृद्य सत्कार करण्यात आला. खेबुडकर सरांनी आम्हाला विश्वास दिला आणि जगण्याची नवी दिशा दाखविली याबद्दल आम्ही त्यांच्या ऋणात राहू, अशा शब्दांत चेतना संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
शाहू स्मारक भवन येथे चेतना अपंगमती विकास संस्थेच्यावतीने प्राचार्य पवन खेबुडकर यांच्या सेवानिवृत्तिनिमित्त कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे उपस्थित होते. व्यासपीठावर ए. बी. राजमाने, संस्थेचे अध्यक्ष नरेश बगरे, दिलीप बापट, सुनील पाटील उपस्थित होते. सन्मानचित्र, मानपत्र देऊन खेबुडकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी खेबुडकर यांच्या कार्यगौरव विषेशांकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर संस्थेतील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. गण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत सोडणाऱ्या रिक्षामामांनी ‘चला चला पटपट जागेवर बसा’ हे गीत सादर केले. पालक, शिक्षकांनी ‘आज आम्ही विश्वासाने’ हे गीत गायले. विद्यार्थ्यांनी ‘हवे आम्हाला आकाशाचे गाणे’ या गीतावर नृत्य केले.
त्यानंतर स्लाईड शोच्या माध्यमातून चेतना संस्थेची स्थापना, खेबुडकर यांनी २८ वर्षांच्या कारकिर्दीत केलेले कार्य, विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवतानाच त्यांच्यातील कलागुणांच्या विकासासाठी केलेले अथक परिश्रम याची माहिती देण्यात आली.
यावेळी संस्थेचे पहिले अध्यक्ष शरद नावरे यांनी खेबुडकर यांनी पालक व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला, असे सांगितले. पालक सुमती जोशी यांनी सरांमुळे आमचा मुलगा स्वावलंबी बनला, असे सांगत त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त केले. यानंतर विद्यार्थी वैभव जोगळेकर, अजया पाटील, राजश्री नाईक, डॉ. सुनील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
उज्ज्वला खेबुडकर व चारुदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले.