सभेत जाणीवपूर्वक गोंधळ : वरुट
By Admin | Updated: August 11, 2014 00:18 IST2014-08-10T23:54:13+5:302014-08-11T00:18:50+5:30
शिक्षक बँकेचे राजकारण : विरोधकांची समांतर सभा; सर्व विषय नामंजूरे

सभेत जाणीवपूर्वक गोंधळ : वरुट
कोल्हापूर : सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देत असताना विरोधकांनी जाणीवपूर्वक गोंधळ करून सभेला गालबोट लावले. गेली पाच वर्षे सभासदाभिमुख कारभार करत डबघाईला आलेली बॅँक आदर्श बनविली; पण राजकीय हेतूने प्रेरित होऊन चांगल्या बॅँकेची बदनामी करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केल्याची खंत प्राथमिक शिक्षक बॅँकेचे अध्यक्ष राजाराम वरुटे यांनी व्यक्त केली. यावेळी अहवालावरील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले.
बॅँकेच्या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष वरुटे म्हणाले, बॅँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पाच तास सभा चालली. सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न होता; पण विरोधकांना सभा उधळायची होती. त्यामुळेच प्रत्येक प्रश्नाला आडवणूक करून कोंडी करण्याचा प्रयत्न केला. गेल्या पाच वर्षांत संचालक मंडळाने पारदर्शक कारभार केला आहे. अहवालाच्या प्रत्येक पानावर सभेतच नव्हे, तर कधीही येऊन आमच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे. सभेत अनेकवेळा शांत राहण्याचे आवाहन करूनही विरोधकांनी ठरवून बॅँकेची बदनामी केली आहे. गेल्या चार सभा अत्यंत शांततेत झाल्या. केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून काही मंडळी एकत्र आली आहेत. जी मंडळी स्वच्छ कारभाराचा डांगोरा पिटत आहेत, त्यांचा इतिहास सभासदांना माहिती आहे. प्रसाद पाटील यांच्या शाहू शिक्षक पतसंस्थेची अवस्था काय आहे? पतसंस्थेच्या अहवालात त्यांनी आॅडिट वर्ग का छापला नाही? अशी विचारणा करत बॅँकेचा व्याजदर कमी करा म्हणणाऱ्यांच्या पतसंस्थेचा व्याजदर १४ टक्के कसा? असा सवालही अध्यक्ष वरुटे यांनी केला.
जयघोष आणि निषेध
सभा संपल्यानंतर विरोधकांनी एकच गोंधळ करण्यास सुरुवात केल्याने सत्तारूढ गटाच्या समर्थकांनीही जल्लोष सुरू केला. आपल्या नेत्यांचा जयघोष करत विरोधकांच्या निषेधाच्या घोषणा दिल्याने सभास्थळावरील वातावरण चांगलेच तणावपूर्वक निर्माण झाले होते.
निवडणुकीची किनार
आजच्या सभेला बॅँकेच्या आगामी निवडणुकीची किनार दिसत होती. राजाराम वरुटे यांच्या सर्व विरोधकांनी एकत्रित येऊन त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
‘वॉटस अॅप’वरून प्रश्न
सभेपूर्वी चार दिवस अगोदर लेखी प्रश्न विचारण्याचे आवाहन बॅँकेच्या वतीने केले होते.लेखी प्रश्नांबरोबरच अध्यक्ष वरुटे यांच्या मोबाईलवर ‘वॉटस अॅप’द्वारेही प्रश्न विचारले होते.
व्याज विवरणावरून खडाजंगी
अहवालात दाखवलेल्या व्याज विवरणावर आक्षेप घेत सभासदांकडून चक्रवाढ दराने व्याज आकारणी होत असल्याचे रवळू पाटील यांनी सांगितले. यावरून सत्तारूढ व विरोधकांत चांगलीच खडाजंगी उडाली. अखेर अध्यक्ष वरुटे यांनी सरळव्याजानेच आकारणी होत असल्याचे पटवून दिले.
संचालकांना एकेरी भाषा
पन्हाळा शाखेत कर्ज मिळत नसल्याचा आरोप करत रघुनाथ चौगले यांनी संचालक रघुनाथ खोत यांच्याविषयी एकेरी भाषा वापरल्याने गोंधळ उडाला. खोत यांचे समर्थक चौगले यांच्या अंगावर धावून गेल्याने पंधरा मिनिटे झोंबाझोंबी झाली. अखेर कृष्णात कारंडे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या वादावर पडदा पडला.