स्वराभिषेकाने हृदयाच्या तारा छेडल्या

By Admin | Updated: January 23, 2015 23:44 IST2015-01-23T23:11:45+5:302015-01-23T23:44:08+5:30

कल्पना झोकरकरांचे गायन : पं सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सव

The conjunction of heart beat | स्वराभिषेकाने हृदयाच्या तारा छेडल्या

स्वराभिषेकाने हृदयाच्या तारा छेडल्या

कोल्हापूर : भजन, नाट्यगीतांबरोबरच राग गावती आणि केदारमधील विविध बंदिशी सादर करीत प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कल्पना झोकरकर यांनी संगीतप्रेमींवर आपल्या बहारदार स्वरांचा वर्षाव केला़ येथील राम गणेश गडकरी सभागृृहात आज, शुक्रवारी सुमारे दोन तास चाललेल्या या स्वरमैफिलीने पं़ सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सवाची शान वाढविली़
कल्पना झोकरकर यांनी रात्रीच्या प्रहराकडे नेणाऱ्या राग ‘गावती’मधील ‘आस लागे तुम्हरे चरण’ या विलंबित तालातील बंदिशीने या स्वरमैफिलीला सुरुवात झाली़ या बंदीशीनेच उपस्थित रसिकांना त्यांच्या गायनातील उच्च दर्जाची अनुभती आली. यानंतर झोकरकर यांनी द्रु्रत त्रितालातील ‘हमरी पार करो’ ही रचना सादर केली़ समयोचित आलाप, हरकती, ताना, दमदार स्वररचना आणि संवादिनीतून हृदयाच्या तारा छेडणारे स्वर यांमुळे संगीतप्रेमी स्वरांच्या दुनियेत तल्लीन झाले होते़
यानंतर झोकरकर यांनी केदार रागातील ‘कंगणवा मोरा’ आणि ‘कान्हा रे नंदनंदन’ या बंदिशी सादर केल्या़ तसेच काफी रागातील ‘माधो मुकुंद मुरारी’ हा टप्पा पेश केला़ ‘हे सूरांनो चंद्र व्हा’ या नाट्यगीताला उपस्थितांनी भरभरून दाद दिली़ यावेळी कल्पना झोकरकर यांनी गायलेल्या बंदिशी, नाट्यगीत, भजन अशा एकपेक्षा एक रचनांच्या अखंडित स्वराभिषेकाची अनुभूतीच श्रोत्यांनी अनुभवली़ ‘भोला मन लागी’ या निर्गुणी भजनाने या सुरेल मैफिलीचा शेवट झाला़ महेश देसाई यांनी तबल्यास साथ केली. तानपुऱ्यास धनश्री फडके, राजश्री बांबुळकर यांनी, तर हार्मोनियमवर अण्णा बुगड यांनी साथ केली़
यावेळी गणेश गाडगीळ, कविता कडेकर, बाळासाहेब घाडगे, विनोद डिग्रजकर, श्रीकांत डिग्रजकर, आदी उपस्थित होते़ नंदकुमार मराठे यांनी सूत्रसंचालन केले़

Web Title: The conjunction of heart beat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.