कॉग्रेसच्या जि. प. सदस्यांना पक्षादेश लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:16 IST2021-07-12T04:16:07+5:302021-07-12T04:16:07+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडीसाठी कॉंग्रेस पक्षाने आपल्या सदस्यांना जाहीर पक्षादेश ...

कॉग्रेसच्या जि. प. सदस्यांना पक्षादेश लागू
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडीसाठी कॉंग्रेस पक्षाने आपल्या सदस्यांना जाहीर पक्षादेश लागू केला आहे. त्यानुसार विरोधी मतदान केल्यास किंवा गैरहजर राहिल्यास अपात्र करण्याचा इशारा या पक्षादेशाव्दारे देण्यात आला आहे. कॉंग्रेसचे गटनेता उमेश आपटे यांनी हा आदेश काढला आहे.
जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे १४ सदस्य निवडून आले होते. यातील ज्येष्ठ सदस्य बंडा माने यांच्या निधनानंतर त्यांचे नातू प्रवीण हे सदस्य झाले. परंतु, त्यांचेही दुर्दैंवाने गेल्यावर्षी निधन झाले. त्यामुळे सध्या १३ सदस्य कार्यरत आहेत. या सर्वांच्या नाव, गाव, पत्त्यासह त्यांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८७चे कलम ३/१ अन्वये जाहीरपणे हा पक्षादेश काढण्यात आला आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती निवडीसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व घटक पक्षांच्या उमेदवारांना कॉंग्रेस पक्षाचे गटनेता यांनी सुचविलेल्या उमेदवाराला मतदान करावे. या पक्षादेशाचे पालन न केल्यास जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण अपात्र ठरू शकता, असे पक्षादेशात नमूद केले आहे.
चौकट
पक्षादेशाचा अनेकांकडून भंग
पक्षाकडून पक्षादेश काढला जातो. परंतु, तो पाळला गेला नाही म्हणून नंतर कारवाई केल्याची उदाहरणे कमी आहेत. शौमिका महाडिक यांना अध्यक्ष करताना रेश्मा राहुल देसाई आणि सचिन बल्लाळ हे दोन कॉंग्रेसचे तर विजय बोरगे हे राष्ट्रवादीचे सदस्य गैरहजर राहिले होते. त्यावेळीही पक्षादेश लागू करण्यात आला होता. परंतु, नंतर कोणावर काहीही कारवाई झाली नाही. अशातच पाच महिन्यांत सदस्यांची मुदतच संपणार आहे.