काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरावे
By Admin | Updated: July 2, 2015 00:25 IST2015-07-02T00:14:11+5:302015-07-02T00:25:40+5:30
कल्लाप्पाण्णा आवाडे : इचलकरंजी शहर काँग्रेस समितीचा मेळावा

काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरावे
इचलकरंजी : सहकार चळवळीच्या माध्यमातून अनेक दिग्गज नेत्यांनी विकासाची गंगा आणली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवीत कार्यकर्त्यांनी वाटचाल केली पाहिजे. मात्र, सध्या बदललेल्या शासनकर्त्यांकडून स्वार्थाचे राजकारण करीत वेगळ्या पद्धतीने लोकशाही रूजवली जात आहे. म्हणूनच गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील लढाई करावी, असे आवाहन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केले.
इचलकरंजी शहर कॉँग्रेस समितीच्या मेळाव्यामध्ये माजी खासदार आवाडे बोलत होते. ते म्हणाले, आबासाहेब खेबुडकर, दत्ताजीराव कदम, बाबासाहेब खंजिरे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना काही पथ्ये आम्ही पाळली आहेत. यापुढे सुद्धा ग्रामीण परिसराचा विकास साधण्यासाठी हेच ध्येय कायम ठेवले पाहिजे.
माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, सत्ता आणि राजकारण बदलल्यानंतर भूलथापा देऊन जनतेची फसवणूक करण्याचे कारनामे भाजप करीत आहे. विकासकामांकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम सुरू आहे. आता कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी सजगपणे चुकीच्या कामाला विरोध करावा.
सुरुवातीला प्रकाश मोरे यांनी स्वागत व अहमद मुजावर यांनी प्रास्ताविक केले. शामराव कुलकर्णी, शशांक बावचकर, आदींनी आपले विचार मांडले. मेळाव्यासाठी दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, प्रकाश सातपुते, रणजित कदम, विलास गाताडे, रणजित जाधव, सुनील पाटील, बाळासाहेब कलागते, अंजली
बावणे, राहुल खंजिरे, चंद्रकांत इंगवले, अमृत भोसले, आदी उपस्थित होते. यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे यांना आर्य भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
बिरंजे यांच्यावर अविश्वास ठराव
मेळाव्यामध्ये बोलताना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी नगरपालिकेचे आयजीएम हॉस्पिटल, काळम्मावाडी नळ योजना आणि रस्ता कामासाठी मंजूर झालेले बारा कोटी रुपये आदींबाबत प्रश्न उपस्थित करून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच संधिसाधूपणाने राजकारणात पोळी भाजून घेणाऱ्यांना धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले. एक वर्षाची मुदत संपताच नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करावा, असेही निर्देश दिले.