कॉँग्रेस लढविणार महापालिका
By Admin | Updated: May 14, 2015 01:13 IST2015-05-14T01:07:11+5:302015-05-14T01:13:29+5:30
समिती नियुक्त : पतंगराव कदम अध्यक्ष, जूनमध्ये मेळावा

कॉँग्रेस लढविणार महापालिका
कोल्हापूर : आॅक्टोबर महिन्यात होणारी महानगरपालिकेची निवडणूक कॉँग्रेस पक्षातर्फे लढविण्याचा निर्णय बुधवारी मुंबईत झालेल्या कॉँग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. या निवडणुकीच्या निमित्ताने माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली पाचजणांची समिती नियुक्त करण्यात आली असून, या समितीला सर्वाधिकार देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. महापालिका निवडणुकीचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी करावे, असा प्रस्ताव पुढे आला.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. कॉँग्रेसतर्फे ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली. या समितीत जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील, माजी मंत्री सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे, नगरसेवक सत्यजित कदम यांचा समावेश आहे. या समितीने प्रभाग व आरक्षण निश्चिती झाल्यानंतर उमेदवारांची निवड तसेच प्रचाराची यंत्रणा राबवायची आहे. पक्षाची उमेदवारी देण्याचा निर्णय या समितीनेच घ्यायचा आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण करण्याच्या हेतूने जूनच्या पहिल्या आठवड्यात कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार असून, मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. निवडणूक यंत्रणा कशा प्रकारे राबविता येईल, या अनुषंगानेही यावेळी चर्चा झाली.
महाडिक अनुपस्थित
बैठकीला आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार मालोजीराजे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, संध्या घोटणे यांनाही बोलाविले होते; परंतु हे सर्वजण बैठकीला अनुपस्थित होते. याबाबत पी.एन. पाटील यांनी सांगितले की ,महाडिक यांना पक्षातर्फे निमंत्रण देण्यात आले होते;परंतु ते त्यांना मिळाले की नाही हे समजले नाही; परंतु ते कॉँग्रेसबरोबर असतील.
विधानसभेचा आढावा
कोल्हापूर उत्तरचे कॉँग्रेसचे उमेदवार नगरसेवक सत्यजित कदम यांनी निवडणुकीचा आढावा प्रदेशाध्यक्षासमोर सादर केला. उत्तर मतदार संघात कॉँग्रेसचे २५ नगरसेवक असून, केवळ तीन नगरसेवकांनी आपला प्रचार केला. अन्य कोणीही आपला प्रचार केला नाही. त्यामुळेच आपला पराभव झाला असे कदम यांनी सांगितले. त्यावेळी आता मी प्रदेशाध्यक्ष आहे, कार्यकर्त्यांना कामाला लावूया, असे चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)