काँग्रेसचा आत्मघात
By Admin | Updated: October 21, 2014 00:20 IST2014-10-21T00:03:39+5:302014-10-21T00:20:27+5:30
काँग्रेसला शहाणपण सुचलेले नाही

काँग्रेसचा आत्मघात
भारत चव्हाण - कोल्हापूर --कित्येकदा शेवटच्या क्षणी होणाऱ्या दगाबाजीचा फटका बसला तरीही काँग्रेसला शहाणपण सुचलेले नाही. बदला घेण्याची जुनी पद्धत नेत्यांच्या मनात आजही नव्याने घर करून राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली. एकेकाळी काँग्रेसच्या प्रभावाखाली असलेल्या जिल्ह्यातील नेत्यांना आता ‘कुठे आहे जिल्हा माझा’ अशी म्हणायची वेळ आली.
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्ह्यात काँग्रेस राहणार काय? असा प्रश्न निर्माण झाला असताना पी. एन. पाटलांनी काँग्रेसला सावरले; परंतु दुसऱ्या बाजूने पक्षात राहून पक्षाच्या विरोधात कृत्य करणाऱ्यांची संख्याही कमी नव्हती. महादेवराव महाडिक-सतेज पाटील, पी. एन. पाटील-प्रकाश आवाडे, आवाडे-आवळे असे एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करणारे गट सक्रिय राहिले. महाडिक-सतेज पाटील यांच्यातील वादाने तर काँग्रेसचे खूपच नुकसान झाले. त्यांच्यातील वादाने कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण अशा दोन जागा गमवाव्या लागल्या. अशीच स्थिती काहीशी ‘राधानगरी’मधून झाली. राधानगरी की भुदरगड या वादात काँग्रेसचे स्थानिक नेते पडले. त्यातूनच मग वैयक्तिक हेवे-दावे सुरू झाले. राधानगरीतील नेते, कार्यकर्ते प्रचार करणार नव्हते. त्यामुळे बजरंग देसार्इंना उमेदवारी दिल्यानंतरही त्यांना माघार घ्यावी लागली. इथे काँग्रेसच्या पराभूत मनोवृत्तीचे दर्शन झाले.
कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसला संधी असताना सत्यजित कदम यांना धडा शिकविण्यासाठी कार्यकर्त्यांत चढाओढ झाली. काँग्रेस काही पदाधिकारी शिवसेनेच्या प्रचारात होते. ‘दक्षिण’मधून सतेज पाटील यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांनी सुपारी घेतली. इचलकरंजीत प्रकाश आवाडे यांच्या विरोधात काँग्रेस पक्षातीलच बारा नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवाराला मदत केली.
शिरोळमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेचा प्रचार करीत राहिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वचपा काढण्याच्या नादात काँग्रेसने आपल्याच पायावर दगड मारून घेतला. करवीर व हातकणंगले येथे उमेदवारांना अतिआत्मविश्वास नडला. काँग्रेसने स्वत:चा आत्मघात करून घेतला. जिल्ह्यात सक्षम नेतृत्व नसल्यानेच हे सगळे घडले. काँग्रेसनेच काँग्रेसचा पराभव केला हे नक्की !