‘उत्तर’मध्ये काँग्रेसचा शिवसेनेला ‘बोनस’
By Admin | Updated: October 22, 2014 00:26 IST2014-10-21T23:56:03+5:302014-10-22T00:26:17+5:30
सर्वसामान्य जनतेत मिसळून त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न, विविध आंदोलनातील सक्रिय भागीदारी आणि सातत्याने जनतेशी संपर्क ठेवल्याची पोचपावती

‘उत्तर’मध्ये काँग्रेसचा शिवसेनेला ‘बोनस’
भारत चव्हाण - कोल्हापूर -सर्वसामान्य जनतेत मिसळून त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न, विविध आंदोलनातील सक्रिय भागीदारी आणि सातत्याने जनतेशी संपर्क ठेवल्याची पोचपावती म्हणजे आमदार राजेश क्षीरसागर यांचा विजय, असेच वर्णन कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील निवडणुकीचे करावे लागेल. क्षीरसागर यांच्या विजयाला काँग्रेसअंतर्गत काही गटांतील प्रमुख कार्यकर्त्यांनी हातभार लावल्यानेच त्यांचा विजय तर सुकर झालाच शिवाय २४ हजारांचे मताधिक्य मिळवून शिवसेनेने आपला गडही मजबूत केला. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नाराज गटांची मदत क्षीरसागर यांना ‘बोनस’ ठरली.
कोल्हापूर उत्तरची निवडणूक तशी काँग्रेसला एक वर्षापूर्वीपासून सोपी झाल्याचा दावा करण्यात येत होता; परंतु त्यांच्याकडे मातब्बर उमेदवारच नसल्याने हा दावा चुकीचा ठरला. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतर सत्यजित कदम यांचे नाव आपसूक च पुढे आले. त्यांनीही दोन वर्षांपासून तयारी केली होती. टोलच्या आंदोलनात भाग घेऊन जनतेच्या प्रश्नावर लढत राहिले; परंतु त्यांचा हेतू मतदारांना स्पष्ट माहीत होता. गणेशोत्सवाच्या माध्यमातून कदम सक्रिय झाले.
‘कोल्हापूर उत्तर’मतदारसंघाचे राजकारण ‘कोल्हापूर दक्षिण’च्या मतदारसंघात गुंफले गेल्याने काँग्रेस व सत्यजित कदम यांच्यासमोर अडचणी वाढत गेल्या. महाडिक यांचे नातेवाईक सत्यजित कदम यांना सतेज पाटील यांचा होणारा विरोध स्वाभाविक होता. बहुतांशी नगरसेवक कदम यांच्या प्रचारापासून दूर राहिले. शेवटी-शेवटी तर अनेकांनी उघडपणे क्षीरसागर यांची पाठराखण केली. त्यातच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधात एकप्रकारची लाट जनतेत तयार झाली होती. त्याचा मोठा फटका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसला. आर. के. पोवार यांनी प्रचारात आघाडी घेऊनही त्यांना जनतेने साथ दिली नाही. भाजपच्या महेश जाधव यांनी पहिल्या प्रयत्नात चांगली मते घेतली असली तरी हा मोदींचा करिश्मा होता.
क्षीरसागर यांनी टोल आणि एलबीटीच्या आंदोलनात सहभाग घेतला. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सहभाग हा लोणच्यासारखा होता. त्याचा पुरता फायदा क्षीरसागर यांनी घेतला. एलबीटीच्या आंदोलनातही त्यांना व्यापारीवर्गाची मोठी सहानुभूती मिळाली. त्यामुळे क्षीरसागर यांची मतदारसंघावरील पकड अधिक मजबूत झाली आणि पक्षांतर्गत विरोधही मावळला. ही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू होती.
भाकप, माकप, शेकाप व जनता दल अशा डाव्या पक्षांची एकेकाळी असलेली मोट विस्कळीत झाल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाले. सामान्य माणसांसाठी नेहमी रस्त्यावर असलेल्या या पक्षांना तुम्ही आता राजकारण करूच नका, असेच मतदारांनी सुचवायचे आहे की काय असे वाटण्यासारखी मते या पक्षाच्या उमेदवारांना मिळाली आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला पर्याय म्हणून भाजप शिवसेनेला मतदार स्वीकारत आहेत, परंतु डाव्यांना स्वीकारायची तयारी नाही. भाकपच्या रघुनाथ कांबळे व शेकापच्या मनीष महागांवकर यांना मिळालेल्या मतांवरूनच हे स्पष्ट झाले आहे.