राधानगरीत राष्ट्रवादीला काँग्रेसचा विरोध
By Admin | Updated: July 31, 2014 23:32 IST2014-07-31T22:04:43+5:302014-07-31T23:32:30+5:30
करवीरचे राजकारण : ए. वाय. पाटील यांच्या भूमिकेवर काँग्रेसमधून नाराजी

राधानगरीत राष्ट्रवादीला काँग्रेसचा विरोध
राशिवडे : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने केलेल्या मदतीची शाई वाळण्याअगोदरच राष्ट्रवादीचे नेते ए. वाय. पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या विरोधातील शिवसेनेच्या उमेदवाराला साथ देण्याचे आवाहन करीत आहेत. प्रामाणिकपणे मदत करणाऱ्या काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादीला राज्यात आघाडी झाली तरीही राधानगरी तालुक्यातील काँग्रेसची साथ असणार नाही, अशी भूमिका राधानगरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हिंदुराव चौगले, ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे, उदयसिंह पाटील, ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली. ते म्हणाले की, आतापर्यंत काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळून विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकांत जिल्ह्यात उच्चांकी मते देऊन निवडून आणले. लोकसभा निवडणुकीमध्ये राधानगरी तालुक्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला करवीरपाठोपाठ मताधिक्य दिले. राधानगरी-भुदरगडचे राष्ट्रवादीचे नेते काम झाले की काँग्रेस कार्यकर्त्यांना कवडीची किंमत देत नाहीत. गावागावांत भांडणे लावण्याचा उद्योग करतात. भोगावती कारखाना आणि शिक्षण मंडळामध्ये या मंडळींनीच राजकीय वाद वाढविले आहेत. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी करवीरमधून लाखमोलाची मदत केली, म्हणून राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला, याचे भान न ठेवता याच पी. एन. पाटील यांच्याविरोधात ए. वाय. पाटील विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करत असतील तर आम्ही त्यांना विधानसभेला मदत का करायची? राज्यात आघाडी झाली तरी राधानगरी-भुदरगडमध्ये आम्ही काँग्रेसह समविचारी गट विधानसभेला राष्ट्रवादीला मदत करणार नाही. विकासकामांत अडचणी, कार्यकर्त्यांना होणारा राजकीय त्रास व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विश्वासघातकी स्वभाव असेल तर त्यांच्याविरोधात ठाम राहून त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
संजयसिंह पाटील, किशाबापू किरूळकर, ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळे, ‘बिद्री’चे संचालक विजय मोरे, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे, पंचायत समितीचे सदस्य जयसिंग खामकर, नंदकुमार सूर्यवंशी, जगदीश लिंग्रस, रमेश वारके, अॅड़ बी. जी. खांडेकर, धीरज डोंगळे, सुधाकर साळोखे, ए. डी. चौगुले यांच्यासह भोगावती-बिद्री कारखान्याचे माजी संचालक व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)