कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक एकवटले

By Admin | Updated: May 13, 2016 00:59 IST2016-05-13T00:23:50+5:302016-05-13T00:59:34+5:30

इचलकरंजी पालिका : कृष्णा नळ पाणी योजना, रस्त्याच्या कामासाठी विशेष सभेची मागणी

Congress-NCP corporators unite | कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक एकवटले

कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक एकवटले

इचलकरंजी : शहरास पाणी पुरविणाऱ्या कृष्णा नळ योजनेची दाबनलिका बदलण्याचे २७ कोटी रुपयांचे काम जीवन प्राधिकरणाऐवजी आणि शहर अंतर्गत रस्ते करण्याची १५ कोटी रुपयांची कामे शासनाच्या बांधकाम खात्याऐवजी नगरपालिकेच्यावतीने केली जावीत, यासाठी निर्णय घेण्यासाठी पालिकेची तातडीने विशेष सभा बोलवावी, अशा आशयाची मागणी राष्ट्रीय कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या ३३ नगरसेवकांनी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्याकडे केली आहे.
ही दोन्ही कामे नगरपालिकेऐवजी शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करून घेण्याचा निर्णय आमदार सुरेश हाळवणकर यांनी घेतला आहे. त्याप्रमाणे शासनदरबारी निर्देश झाले असल्यामुळे त्याच्या विरोधात पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सुनावणी झाली असताना मुंबई उच्च न्यायालयाने हा विषय नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवून सभागृहाने मंजूर केलेला प्रस्ताव न्यायालयात सादर करावा, असे आदेश दिले आहेत. याबाबतची उच्च न्यायालयातील सुनावणी १३ जूनला होणार आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी राष्ट्रीय कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, उपनगराध्यक्ष महावीर जैन, गटनेते बाळासाहेब कलागते, सभापती दिलीप झोळ, नगरसेविका बिस्मिल्ला मुजावर, बांधकाम सभापती लतिफ गैबान, राष्ट्रवादीचे नगरसेवक अशोकराव जांभळे, बंडोपंत मुसळे, आदींनी सभा बोलाविण्याविषयीचे निवेदन नगराध्यक्षा बिरंजे यांना दिले.


बंडखोर व कारंडे गटाच्या स्वाक्षऱ्या नाहीत
महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ कलम ८१ (२) नुसार विशेष सभा बोलाविण्यासाठी ३३ नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनावर कॉँग्रेसच्या ३२ पैकी २५ नगरसेवकांच्या सह्या आहेत, तर राष्ट्रवादीच्या ११ पैकी आठ नगरसेवकांच्या सह्या आहेत. मात्र, कॉँग्रेसमधील बंडखोर गट व राष्ट्रवादीतील कारंडे गट यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत.

इचलकरंजीच्या नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना विशेष सभा बोलविण्याचे निवेदन देताना कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील. यावेळी लतिफ गैबान, दिलीप झोळ, बंडोपंत मुसळे, अशोकराव जांभळे, बाळासाहेब कलागते, महावीर जैन व बिस्मिल्ला मुजावर उपस्थित होते.

Web Title: Congress-NCP corporators unite