निपाणी तालुक्यात काँग्रेस आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:25 IST2020-12-31T04:25:09+5:302020-12-31T04:25:09+5:30

निपाणी : दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या निपाणी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींचे निकाल बुधवारी समोर आले. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू ...

Congress leads in Nipani taluka | निपाणी तालुक्यात काँग्रेस आघाडीवर

निपाणी तालुक्यात काँग्रेस आघाडीवर

निपाणी : दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या निपाणी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींचे निकाल बुधवारी समोर आले. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू असल्याने संपूर्ण पंचायतींचे निकाल समजू शकले नाहीत; पण आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालात काँग्रेस पुरस्कृत आघाडीने वर्चस्व मिळवल्याचे चित्र दिसून आले आहे. अतिशय चुरशीने पार पडलेल्या निवडणुकीत बहुतांश उमेदवार हे एक-दोन-तीन अशा फरकाने निवडून आले आहेत.

निपाणी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी २७ डिसेंबरला मतदान झाले होते. बुधवारी याचे निकाल जाहीर झाले. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू असल्याने संपूर्ण निकाल हाती आले नाहीत; पण जाहीर झालेल्या पंचायतीच्या क्षेत्रात काँग्रेसने चांगली कामगिरी केल्याचे समोर आले आहे.

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर निपाणी शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणी केंद्रांवर विनाकारण गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा होता. येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात मतमोजणी करण्यात आली. एकूण १९८ कर्मचाऱ्यांनी ही मतमोजणी केली. चुरशीने निवडणूक झाली तरी मतमोजणी शांततेत पार पडली. सकाळी आठ वाजता पहिली फेरी झाली. यानंतर दुसरी व तिसरी अशा तीन फेऱ्या झाल्या. काही पंचायतींची मतमोजणी मात्र उशिरा सुरू झाली.

दिवसभरात जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी मतमोजणी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी चोख व्यवस्था केल्याने कोणताच गोंधळ झाला नाही. अकोळ क्रॉस व ग्रीन पार्कच्या प्रवेशाला पोलिसांनी रस्ता बंद केला होता.

निकाल लागलेल्या पंचायती

कोडणी, सौंदलगा, कोगनोळी, अकोळ, गळतगा, भोज, मांगूर, कारदगा, बेडकीहाळ, कुर्ली, बेनाडी, कुन्नर, शिरदवाड, आडी, लखनापूर, माणकापूर, यमगर्णी, शिरगुप्पी, जत्राट, अप्पाचीवाडी, हुन्नरगी, शेंडूर, ममदापूर, बारवाड, यरनाळ, ढोणेवाडी, सिदनाळ.

फोटो

निपाणी : मतमोजणी केंद्राच्या बाहेर उमेदवाराच्या समर्थकांनी गर्दी केली होती.

Web Title: Congress leads in Nipani taluka