काँग्रेस कार्यकर्त्याला ‘भाजप’ची उमेदवारी
By Admin | Updated: October 3, 2015 01:10 IST2015-10-03T01:10:13+5:302015-10-03T01:10:13+5:30
साने गुरुजी वसाहत : आनंदा सुतार यांनी चंद्रकांतदादा यांच्याकडे कैफियत मांडली

काँग्रेस कार्यकर्त्याला ‘भाजप’ची उमेदवारी
कोल्हापूर : गेल्या दहा वर्षांपासून पक्षाचे काम करत असल्यामुळे भाजप-ताराराणी आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली होती. तसेच पक्षाच्या नेत्यांनीही कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, प्रत्यक्षात उमेदवारी देताना सच्चा कार्यकर्त्यांना डावलून साने गुरुजी वसाहत (प्रभाग क्र. ७४) येथे कॉँग्रेसचे कार्यकर्ते अविनाश कुंभार यांच्या पत्नी मनीषा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षात राहायचे की नाही? अशी कैफियत भाजपचे संघटक व महाराष्ट्र राज्य सुतार-लोहार संघटनेचे अध्यक्ष आनंदा सुतार यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे मांडली आहे.
सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गेल्या दहा वर्षांपासून आपण कुटुंबीयांसह भाजपमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे साने गुरुजी वसाहत (प्रभाग क्र. ७४) येथे ‘ओबीसी महिला’ आरक्षण जाहीर झाल्याने येथून आपल्या भावजय विमल हिंदुराव सुतार यांच्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीमधून उमेदवारी मागितली होती. मुलाखतीनंतर महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी प्रभागात कार्यक्रम घेऊन तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रभागातील घराघरांत संपर्क साधून पूर्णपणे तयारी केली. असे असताना आपल्याला विश्वासात न घेता कॉँग्रेसचे कार्यकर्ते अविनाश कुंभार यांच्या पत्नी मनीषा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. उमेदवारी देताना कोणालाही विश्वासात घेतलेले नाही.
इतर प्रभागांतही अशाच प्रकारे निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून पैसेवाल्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षात राहायचे की नाही? याचा विचार करून त्यांना न्याय द्यावा; अन्यथा नाराज कार्यकर्ते, पदाधिकारी चार दिवसांत पक्षातून बाहेर जातील, असा इशारा या तक्रार अर्जाद्वारे सुतार यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)