जतमध्ये काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत मारामारी

By admin | Published: May 6, 2015 12:36 AM2015-05-06T00:36:47+5:302015-05-06T00:37:22+5:30

मिरजेत मतदान केंद्र आवारात बाचाबाची

Congress-BJP workers wage fight in Jat | जतमध्ये काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत मारामारी

जतमध्ये काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत मारामारी

Next

जत : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदाराने सोबत मदतनीस नेण्याच्या कारणावरून जत येथील मंडल अधिकारी सभागृहातील मतदान केंद्रासमोर काँग्रेस व भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली. ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या मारामारीत कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
मंगळवारी सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शेतकरी सहकारी पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी मतदारासोबत मदतनीस पाठवून मतदान करून घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर रयत सहकार पॅनेलमधील कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला. आम्हाला परवानगी दिली नाही, त्यांनाच कशी दिली? यावरून बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, पंचायत समिती सदस्य सुनील पवार व रयत सहकार पॅनेलमधील विकास सोसायटी गटातील उमेदवार विक्रम सावंत, बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांच्यात सुरुवातीला बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. त्यानंतर आमदार विलासराव जगताप व माजी आमदार उमाजी सनमडीकर यांनी मध्यस्थी करून सर्वांना शांत केले. या घटनेमुळे मतदान केंद्र परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, मतदान प्रक्रियेत कोणताही व्यत्यय आला नाही.
याबाबत मतदान केंद्राध्यक्ष एम. आर. जाधव म्हणाले, मतदान केंद्रात मारामारीची घटना घडली नाही, बाहेर घडली आहे. याशिवाय मारामारी करणाऱ्यांत आता समेट झाला आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मतदान केंद्र व सभोवतालच्या शंभर मीटर परिसरात घडलेल्या घटनेसंदर्भात त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिले, तर आम्ही तत्काळ कारवाई करू. (वार्ताहर)

मिरजेत मतदान केंद्र आवारात बाचाबाची
मिरज : जिल्हा बँक निवडणुकीअंतर्गत मिरजेतील मतदान केंद्राच्या आवारात गोंधळ घातल्याबद्दल काँग्रेसचे कार्यकर्ते उत्तम साखळकर, पी. एल. रजपूत व शिवसेनेचे चंद्रकांत मैगुरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मिरजेत किल्ला भागातील आदर्श शाळेतील मतदान केंद्रावर नेते व कार्यकर्त्यांची सकाळपासूनच गर्दी होती. उमेदवार मदन पाटील, विशाल पाटील, मनोज शिंदे, संग्रामसिंह देशमुख, मंगलताई शिंदे, गजेंद्र कुळ्ळोळी, प्रमोद इनामदार, अमरसिंह पाटील, अय्याज नायकवडी, सभापती दिलीप बुरसे, माजी सभापती अनिल आमटवणे, सुभाष पाटील, अण्णासाहेब कोरे, शीतल पाटील, दिनकर पाटील, अभिजित हारगे यांच्यासह कार्यकर्ते तेथे उपस्थित होते. पोलिसांनी मतदान केंद्रासमोरील रस्ता बंद केला होता. मतदान केंद्राच्या आवारात कोणालाही सोडण्यात येत नव्हते. माजी मंत्री प्रतीक पाटील यांचे स्वीय सहायक पी. एल. रजपूत यांनी मतदान केंद्राच्या आवारात प्रवेश केल्यानंतर मदनभाऊ युवा मंचचे उत्तम साखळकर यांनीही मतदान केंद्राच्या आवारात जाण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी रोखल्याने साखळकर यांनी बॅरिकेट्स ढकलून दिले. यावेळी रजपूत व साखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने बाचाबाचीचा प्रकार घडला. ढवळीतील सोसायटीचे प्रतिनिधी कल्लाप्पा मगदूम यांनी गट बदलल्याच्या संशयावरून राष्ट्रवादीचे अभिजित हारगे व शिवसेनेचे चंद्रकांत मैगुरे यांनी मगदूम यांना मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, विशाल पाटील समर्थकांनी मैगुरे व हारगे यांना विरोध केल्याने दोन्ही गटांत हमरी-तुमरी झाली. पोलिसांनी चंद्रकांत मैगुरे यांच्यासह विशाल पाटील समर्थकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. सायंकाळी मतदान संपल्यानंतर या सर्वांची मुक्तता करण्यात आली.
पंचायत समिती सभापती व दोन माजी सभापती कुंपणावर असल्याच्या संशयावरून उमेदवार मदन पाटील यांनी त्यांची झाडाझडती घेतल्याची चर्चा सुरू होती. मदन पाटील गटाचे काही समर्थक विशाल पाटील यांच्या गटासोबत मंगळवारी मतदान केंद्राबाहेर दिसत होते. मिरजेतील १४२ पैकी १३९ जणांनी मतदान केले. मिरज, म्हैसाळ व पायाप्पाचीवाडी येथील तीन मतदारांनी मतदान केले नाही.

Web Title: Congress-BJP workers wage fight in Jat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.