कॉँग्रेस ऐक्याची एक्स्प्रेस

By Admin | Updated: August 22, 2014 00:52 IST2014-08-22T00:22:09+5:302014-08-22T00:52:03+5:30

हातकणंगले विधानसभा निवडणूक : जयवंतराव आवळेंसाठी पारंपरिक विरोधक एकत्र

Congress Aude Express | कॉँग्रेस ऐक्याची एक्स्प्रेस

कॉँग्रेस ऐक्याची एक्स्प्रेस

आयुब मुल्ला -खोची --विधानसभा निवडणुकीसाठी माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी पुन्हा घरच्या मैदानातून उतरण्याचा निर्णय घेतल्याने हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील लढत चुरशीची होणार आहे. आवळे यांचे काँग्रेसमधीलच पारंपरिक विरोधक माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार महादेवराव महाडिक यांनी एकत्रितपणे आवळेंच्या विजयासाठी झटण्याचा संकल्प केल्याने मतदारसंघात काँग्रेस ऐक्याची एक्स्प्रेस धावणार आहे.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा प्रतिनिधित्व केल्यानंतर आवळे यांनी २००९ च्या निवडणुकीत पुत्र राजू यांना मैदानात उतरविले होते; परंतु थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता.
दरम्यान, लातूरमधून जयवंतराव आवळे यांची खासदारपदी निवड झाली होती. साहजिकच येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचे उमेदवार म्हणून राजू आवळेच निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. तशी घोषणाही जयवंतराव आवळे यांनी केली होती; परंतु ज्येष्ठ नेत्यांचा आग्रह व कार्यकर्त्यांनी जयवंतराव आवळे यांनीच विधानसभा लढवावी, अशी भूमिका घेतल्यामुळे त्यांनी स्वत:च निवडणूक लढण्याचे जाहीर केले.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कोल्हापूर दौऱ्याप्रसंगी आमदार महादेवराव महाडिक यांनी जयवंतराव आवळे यांनाच उमेदवारी देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनीही लोकसभा निवडणुकीत आवळे यांच्या पाठीशी राहण्याचा शब्द दिला असल्याने या दोन नेत्यांच्या समर्थनामुळे आवळे यांचे बेरजेचे राजकारण आता चर्चेत आले आहे.
गेल्या पंधरा दिवसांत आवळे यांनी ५९ गावांचा संपर्क दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात त्यांच्याबरोबर महाडिक-आवाडे यांचे समर्थक होते. त्याचा फायदा त्यांना मिळू शकतो.

Web Title: Congress Aude Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.