परीक्षा केंद्र बदलल्याने गोंधळ

By Admin | Updated: December 2, 2014 00:15 IST2014-12-01T23:50:59+5:302014-12-02T00:15:30+5:30

एम.ए.चा पेपर : प्रवेशपत्रात एक, तर प्रत्यक्षात दुसरेच केंद्र

Confusion by changing the examination center | परीक्षा केंद्र बदलल्याने गोंधळ

परीक्षा केंद्र बदलल्याने गोंधळ

कोल्हापूर : परीक्षा केंद्र बदलल्याची माहिती मिळाली नसल्याने शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण विभागाकडील एम.ए. भाग-एकच्या (इतिहास) विद्यार्थ्यांचा आज, सोमवारी गोंधळ उडाला. पेपरला दहा ते पंधरा मिनिटांचा अवधी उरला असताना धावपळ करत संबंधित विद्यार्थ्यांना दुसरे परीक्षा केंद्र गाठावे लागले.
दूरशिक्षण विभागाच्या एम. ए. (इतिहास) भाग एक या अभ्यासक्रमाची सध्या परीक्षा सुरू आहे. आज दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ‘प्राचीन भारतीय समाज, धर्म आणि संस्कृती’ या विषयाचा पेपर होता. शहरातील शहाजी कॉलेजमधील परीक्षा केंद्रावर या विषयाच्या काही विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. पेपर सुरू होण्यास पंधरा ते वीस मिनिटांची अवधी बाकी असताना या केंद्रावर संबंधित पेपर होणार नसून येथील विद्यार्थ्यांची कमला कॉलेज याठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात आली असल्याची नोटीस फलकावर लावण्यात आल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. दोन ते सव्वा दोनच्या सुमारास आलेल्या विद्यार्थ्यांनी तातडीने रिक्षा तसेच आपल्या पालकांच्या वाहनांमधून गडबडीने कमला कॉलेज गाठले. अचानक केंद्र बदलल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. पेपरसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर शहाजी कॉलेज या परीक्षा केंद्राची नोंद होती. मात्र, प्रत्यक्षात दुसरेच केंद्रावर बैठक व्यवस्था असल्याचा समजातच त्यांची धावपळ झाली. केंद्र बदलाची अशी अचानक सूचना कशी देता असे काही विद्यार्थ्यांनी विचारणा केली असता, त्यांना याठिकाणी विद्यापीठाने केंद्र बदलाचा ‘एसएमएस’ पाठविला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शहाजी कॉलेजमध्ये दूरशिक्षण विभागाच्या एम.ए.च्या तीनशे विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी बैठक व्यवस्था केली आहे. या कॉलेजला ७ व ८ डिसेंबरला ‘नॅक’ची समिती भेट देणार आहे. त्याच्या तयारीसाठी येथील परीक्षा केंद्र बदलून ते कमला कॉलेजमध्ये करण्यात आले. परीक्षा केंद्र बदलाची सूचनेचे एसएमएस दोनवेळा ‘एमकेसीएल’च्या माध्यमातून पाठविलेले आहेत. अचानक परीक्षा केंद्र बदललेले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Confusion by changing the examination center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.