गडहिंग्लज स्वतंत्र जिल्ह्याच्या मागणीने गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:30 IST2021-08-18T04:30:42+5:302021-08-18T04:30:42+5:30
चंदगड पंचायत समितीकडील रिक्तपदांची यादीच वाचून दाखवत भोगण यांनी आपला संताप व्यक्त केला. जर तुम्ही अधिकारी आणि कर्मचारी देणार ...

गडहिंग्लज स्वतंत्र जिल्ह्याच्या मागणीने गोंधळ
चंदगड पंचायत समितीकडील रिक्तपदांची यादीच वाचून दाखवत भोगण यांनी आपला संताप व्यक्त केला. जर तुम्ही अधिकारी आणि कर्मचारी देणार नसाल तर स्वतंत्र गडहिंग्लज जिल्हा करण्याचा ठराव घ्या, अशी मागणी केली. संतापून केलेल्या या मागणीवरून राहुल आवाडे भडकले. ‘ही मागणी बरोबर नाही. जिल्ह्याचे दोन तुकडे करताय काय. असले प्रकार खपवून घेणार नाही’ असे सुनावले. ज्येष्ठ सदस्य अरूण इंगवले म्हणाले, ‘अधिकारी आणि कर्मचारी तुम्हाला मिळावेत यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत; परंतु ही मागणी योग्य नाही. असा ठराव करून वेगळा पायंडा पाडू नका’ यावेळी थोडा वेळ गोंधळ उडाल्यानंतर उपाध्यक्ष शिंपी यांनी सर्वांना शांत केले.
शिंपी म्हणाले की, भोगण यांच्या भावना समजून घ्या. अनेक पदे रिक्त असल्यानेच ते संतापून बोलले आहेत. केवळ चंदगडच नव्हे तर आजरा, भुदरगड, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यातही अनेक पदे रिक्त आहेत. नुकत्याच झालेल्या बदली प्रक्रियेत आम्ही या तालुक्यांमध्ये सर्वांनी जावे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. शासनानेच भरती केली नसल्याने अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे भोगण यांची मागणी बरेाबर नाही ;परंतु त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत.
पंधराव्या वित्त आयोगाचा निधी अजूनही वितरित न केल्याबद्दल इंगवले यांनी आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, बाकीच्या जिल्ह्यात निधी खर्च झाला. कामे संपत आली. तरीही अजून कोणाला किती निधी द्यायचा, हेच तुमचे अजून ठरलेले नाही. निवडणुकीला किती महिने उरलेत, त्यात आचारसंहिता, कोरोना या सगळ्याचा विचार करून हे काम लवकरात लवकर करा. यावेळी सभापती वंदना जाधव, रसिका पाटील, शिवानी भोसले, कोमल मिसाळ, आणि सदस्य युवराज पाटील, संध्याराणी बेडगे ऑनलाइन उपस्थित होत्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
चौकट
मंत्र्यांकडे आम्हाला घेऊन चला
मंत्र्यांना निधी भरपूर असताना परत वित्त आयोगातून त्यांना निधी देण्याची पद्धत पाडू नका, सदस्यांना त्यामुळे निधी कमी पडतोय. तुम्हाला त्यांनी पदाधिकारी केलंय, तुम्हाला बोलताना अडचण असली तर आम्हाला बरोबर न्या. आम्ही बोलतो, असे सांगून इंगवले यांनी सदस्यांना जादा निधी मिळावा, यासाठी आग्रह धरला.
कोट
चंदगड पंचायत समितीमध्ये प्रत्येक विभागात कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे कामे लवकर मार्गी लागत नाहीत. बदल्यांमध्ये कुणीही चंदगड तालुक्यात येण्यासाठी तयार होत नाहीत. यात आमच्या तालुक्यातील जनतेचा काही दोष आहे का... म्हणूनच या भावनेतून मी स्वतंत्र जिल्ह्याचा मुद्दा मांडला.
कल्लाप्पाण्णा भाेगण
जि. प. सदस्य, कोवाड.