वेतनवाढीच्या तफावतीने संघर्षाची चिन्हे

By Admin | Updated: December 17, 2014 23:10 IST2014-12-17T20:32:24+5:302014-12-17T23:10:11+5:30

दुप्पट वाढ कळीचा मुद्दा : कामगार, यंत्रमाग संघटनांच्या वेतनात ७२५ रुपयांचा फरक

Conflicts of conflict, signs of struggle | वेतनवाढीच्या तफावतीने संघर्षाची चिन्हे

वेतनवाढीच्या तफावतीने संघर्षाची चिन्हे

राजाराम पाटील - इचलकरंजी -येथील यंत्रमाग कामगारांना मिळणाऱ्या वेतन वाढीसंदर्भात कामगार संघटना व यंत्रमाग संघटना यांच्यातील तफावतीमुळे पुन्हा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, आठ तास काम आणि त्यावरील कामासाठी दुप्पट वेतन, अशी मागणी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने केल्याने हा विषयसुद्धा कळीचा मुद्दा ठरू लागला आहे.
यंत्रमाग कामगारांना वेतनवाढ मिळण्याबरोबरच किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी. तसेच यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापित करावे या मागणीसाठी यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगार संघटनांनी एकत्रितपणे जानेवारी २०१३ मध्ये आंदोलन छेडले.
यापूर्वी कधीही नाही इतके आंदोलन लांबल्याने तब्बल ४२ दिवसांचा संप झाला; पण विक्रमी मजुरीवाढ मिळाली आणि ५२ पिकाच्या कापडासाठी प्रतिमीटर ८७ पैसे मजुरीचा निर्णय झाला. दरम्यान, दरवर्षी महागाई निर्देशांकाशी निगडित मजुरीवाढीचीही घोषणा केली. जेणेकरून नेहमी होणाऱ्या आंदोलनातून उद्योगाची मुक्तता होईल आणि संपामुळे होणारे नुकसानही टळेल.
उपरोक्त ठरल्याप्रमाणे डिसेंबर २०१३ अखेर किंवा जानेवारी २०१४ मध्ये सहायक कामगार आयुक्तांनी महागाई निर्देशांकाप्रमाणे वेतनवाढीची घोषणा केली नाही. कामगार संघटनांनी मागणी केली. या मागणीत वार्षिक महागाई निर्देशांकाप्रमाणे वेतनवाढ मागितली, तर यंत्रमागधारक संघटनांच्या म्हणण्यानुसार फक्त सहा महिन्यांची वेतनवाढ मिळेल. कारण फेब्रुवारी २०१३ मध्ये वेतनवाढ देताना (८७ पैसे प्रतिमीटर) तेव्हा डिसेंबर २०१२ अखेरची महागाई गृहीत धरली आहे.
हा वाद तत्कालीन कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि कामगार आयुक्त आर. आर. हेंद्रे यांच्यासमोर गेला. कामगार आयुक्त हेंद्रे यांनी यंत्रमागधारक संघटनांचा युक्तिवाद मान्य केला आणि सहा महिन्यांचा महागाई निर्देशांकावर आधारित चार पैसे प्रतिमीटर वाढ दिली आणि या प्रकरणावर पडदा पडला तरी कामगार संघटनांची नाराजी राहिली.
आता कामगार संघटनांनी वार्षिक वेतनवाढ जाहीर करावी. तसेच आठ तास काम आणि त्यावरील कामासाठी (ओव्हर टाईम) दुप्पट पगाराची मागणी केली आहे; पण कामगार संघटना व यंत्रमागधारक संघटनांच्या गणितामध्ये ७२५ रुपये वेतनाचा फरक येत आहे.


शनिवारी यंत्रमागधारकांची बैठक
कामगार वेतनवाढ आणि आठ तासांच्या कामाबद्दल २० डिसेंबरला यंत्रमागधारक संघटनांची बैठक बोलविण्यात येईल आणि त्यानंतर २२ डिसेंबरला कामगार व यंत्रमागधारक यांच्या संघटनांची संयुक्त बैठक बोलविली जाईल, असे सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी सांगितल्याची कामगार नेते दत्ता माने यांनी माहिती दिली.



वार्षिक महागाई निर्देशांक ५३४ आहे. त्याप्रमाणे यंत्रमाग कामगारांना प्रतिमीटर ८ पैसे वेतनवाढ मिळाली पाहिजे. जेणेकरून यंत्रमाग कामगारांना महिन्याला ५,८२४ रुपये वेतन मिळेल. आता जानेवारी २०१५ पासून ८ तास काम व त्यावरील कामासाठी दुप्पट पगार मिळाला पाहिजे, अन्यथा कामगाराला पुन्हा रस्त्यावरील लढाई करावी लागेल.
- भरमा कांबळे,
सचिव, लालबावटा जनरल कामगार युनियन.


गतवर्षीच्या महागाई निर्देशांकाप्रमाणे यंत्रमाग कामगारांना प्रतिमीटर ७ पैसे वेतन मिळेल. त्यांचा महिन्याचा पगार ५०९६ रुपये होईल. त्याचबरोबर माजी कामगारमंत्री मुश्रीफ यांनी ८ तासांच्या कामाबद्दल काही भाष्य केल्याचे ऐकिवात नाही. यंत्रमाग कामगार मात्र त्यांना अधिक पगार मिळावा, यासाठी ८ तासांपेक्षा अधिक काम करतात, तशी मागणी कामगार वर्गाचीच आहे.
- सतीश कोष्टी, अध्यक्ष,
इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशन.

Web Title: Conflicts of conflict, signs of struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.