इचलकरंजीत दुकाने सुरू करण्यावरून संघर्ष अटळ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:17 IST2021-07-11T04:17:42+5:302021-07-11T04:17:42+5:30
इचलकरंजी : शहरातील सर्वच दुकाने सुरू करण्यावरून शुक्रवारी मोठा वादंग निर्माण झाला. आरोग्य राज्यमंत्री यड्रावकार यांनी शुक्रवारपासून दुकाने सुरू ...

इचलकरंजीत दुकाने सुरू करण्यावरून संघर्ष अटळ?
इचलकरंजी : शहरातील सर्वच दुकाने सुरू करण्यावरून शुक्रवारी मोठा वादंग निर्माण झाला. आरोग्य राज्यमंत्री यड्रावकार यांनी शुक्रवारपासून दुकाने सुरू होतील, अशी घोषणा केली होती. त्यानुसार व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू केली. मात्र पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याचा इशारा दिल्याने दुकाने पुन्हा बंद झाली. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासन यांच्यात बैठक पार पडली. यानंतर आमदार आवाडे व माजी खासदार शेट्टी यांनी सोमवार १२ जुलैपासून कोणत्याही परिस्थितीत दुकाने सुरू करणार असल्याचा इशारा दिल्याने इचलकरंजीत दुकाने सुरू करण्यावरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सर्वच दुकाने सुरु करण्यावरून वाद उफाळून येत आहे. प्रशासनासोबत सहावेळा बैठका घेऊनही याबाबत ठोस निर्णय होताना दिसत नाही. वारंवार विनंती करूनही सरकार ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. व्यापाऱ्यांनी बऱ्याचदा दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र कारवाईचा धाक दाखवल्याने दुकाने पुन्हा बंद करण्यात आली. दुकाने चालू व बंद करण्याचा खेळ अनेक दिवसांपासून शहरात सुरू असल्याने व्यापारी संभ्रमावस्थेत आहेत. खासदार धैर्यशील माने यांनी नगरपालिकेत प्रशासन व व्यापारी प्रतिनिधी यांची बैठक घेतली. बैठक सुरू असतानाच व्यापारी व लोकप्रतिनिधी यांच्यात शिवीगाळ व अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे दिवसभर पालिका वर्तुळात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध मार्गाने वारंवार चर्चा करून प्रश्न सुटत नसल्याने व्यापाऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळे व्यापारी आक्रमक पवित्रा घेत, अखेर सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा पवित्रा घेतला आहे.