‘कुमुदा शुगर्स’च्या संचालकांची मालमत्ता जप्त करा
By Admin | Updated: January 16, 2016 00:48 IST2016-01-15T23:54:07+5:302016-01-16T00:48:46+5:30
शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची मागणी : निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

‘कुमुदा शुगर्स’च्या संचालकांची मालमत्ता जप्त करा
कोल्हापूर : ‘कुमुदा शुगर अॅँड अॅग्रो प्रॉडक्टस लि., बेळगाव’ या कंपनीने गतवर्षी रयत सहकारी साखर कारखान्यामधून उसाचे गाळप केले आहे. परंतु यापैकी ‘एफआरपी’नुसार प्रतिटन १२५० रुपयेच रक्कम ऊस उत्पादकांना दिली असून, उर्वरित रकमेसाठी संचालकांची कोल्हापूर, सांगली व सातारा येथील स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी शुक्रवारी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
साखर आयुक्तांनी २२ एप्रिल २०१५ ला महसूल वसुली प्रमाणपत्र जारी केले होते. ऊस उत्पादकांना देय असणारी रक्कम पूर्णपणे फेड होण्यासाठी प्रसंगी कुमुदा शुगर्स च्या स्थावर व जंगम मालमत्तेची विहित पद्धतीद्वारे विक्री करून तसेच आवश्यकतेनुसार कुमुदा शुगर यांनी रयत सहकारी साखर कारखाना येथे उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीतून वसुल करण्याचे आदेश दिले होते. ही रक्कम वसुलीतून ऊस पुरवठादार शेतकरी यांचे ऊस नियंत्रण आदेशातील तरतुदीनुसार म्हणजे ‘एफआरपी’ रक्कम खात्री करून संबंधितांना अदा करण्यासाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत केले होते. या आदेशानुसार कुमुदा शुगर्समार्फत रयत साखर कारखाना यांच्या कारखान्यावरील संपूर्ण साखर मोलॅसिस बगॅस इत्यादी उत्पादनाची जप्ती व विक्री करण्याची कार्यवाही करून २८ सप्टेंबर २०१५ अखेर १५ कोटी ४१ लाख १५ हजार २५४ रुपये ऊस उत्पादकांना देण्यात आली आहे. ही रक्कम देऊनही साखर आयुक्तांच्या आदेशानुसार २५ कोटी ३६ लाख ७९ हजार ३२९ पैकी माल जप्ती व विक्री रक्कम वजा जाता ९ कोटी ९५ लाख ६४ हजार ७५ रुपये व त्यावरील व्याजासह अद्याप वसुली होणे बाकी आहे. वरील रकमेच्या वसुलीस कुमुदा शुगर्स व रयत कारखान्याच्या करारातील अटींचा विचार करता कुमुदा शुगर्सच्या संचालक मंडळाच्या वैयक्तिक स्थावर व जंगम मालमत्ता विक्री करून हे पैसे द्यावेत, असे या निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात विजय पाटील, अंकुश निकम, भानुदास देसाई, रमेश हंजे, राजेंद्र पाटील, आदींचा समावेश होता.