गर्भलिंग चाचणीची कबुली
By Admin | Updated: June 30, 2015 00:42 IST2015-06-30T00:42:22+5:302015-06-30T00:42:45+5:30
संशयित डॉक्टरचे रॅकेट : शिरसेतील एजंटास अटक

गर्भलिंग चाचणीची कबुली
कोल्हापूर : कासेगाव येथील दवाखान्यासह घरी व आलिशान मोटारीमध्ये सोनोग्राफी यंत्राद्वारे गर्भलिंग चाचणी केल्याची कबुली संशयित डॉक्टर विक्रम विलास आडके (वय ३५) याने दिली आहे. त्याने यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत एजंट नेमले आहेत. त्यापैकी शिरसे (ता. राधानगरी) येथील एका एजंटाला अटक केली आहे. संशयित गजेंद्र बापुसो कुसाळे (२७) असे त्याचे नाव असून, त्याच्या घराची झडती घेतली असता सोनोग्राफी यंत्र मिळून आले. आतापर्यंत याप्रकरणी पाचजणांना
अटक व दोन सोनोग्राफी यंत्रे जप्त केली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. आलिशान कारमध्ये गर्भलिंग चाचणी करणारे मोबाईल सोनोग्राफी यंत्र कासेगावचा डॉक्टर विक्रम आडके यांच्याकडून घेतल्याची कबुली संशयित डॉ. हिंदुराव पोवार याने पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी डॉ. आडके याला अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी केली असता कासेगाव येथील दवाखान्यात, मोटारीत व घरी गर्भलिंग चाचणी केली आहे. तसेच आणखी एक यंत्र गजेंद्र कुसाळे या एजंटाला दिले असल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलीसांनी रविवारी रात्री कुसाळे याच्या घरी छापा टाकला असता, एका बॅगेमध्ये एका कंपनीचे चायनामेड सोनोग्राफी मशीन मिळून आले. यापूर्वी पोलिसांनी जप्त केलेले मशीन त्याच कंपनीचे आहे. त्यामुळे पुन्हा महापालिकेच्या वैद्यकीय पथकास पाचारण करण्यात आले. पथकाचे सदस्य डॉ. सुनंदा नाईक, योगिता भिसे, अजित पाटील हे पोलीस ठाण्यात आले. त्यांनी संबंधित यंत्राची पाहणी केली असता ते चायना बनावटीचे गर्भलिंग चाचणी करणारे सोनोग्राफी यंत्र असल्याचे स्पष्ट झाले, ते त्यांनी सील करून ताब्यात घेतले.
दरम्यान, संशयित डॉ. आडके याचे सांगली, कोल्हापूर असे रॅकेट असून, त्यामध्ये डॉक्टर व एजंटाचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस संशयितांकडून कसून माहिती घेत आहेत. आडके याने आणखी किती यंत्रे सांगली, कोल्हापूर जिल्ह्णांत पुरविली आहेत. ती त्याने कोठून आणली, याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.
कळेत चौकशी
पोवार व नाईक या डॉक्टरांच्या मोबाईलचे सीडीआर पोलिसांच्या हाती मिळाले असून, त्यावरून कळे (ता. पन्हाळा) येथील दोघा डॉक्टरांकडे पोलीस चौकशी करीत आहेत. पोवार व नाईक यांच्याशी लागेबांधे असणारे डॉक्टर, एजंट व गर्भलिंग चाचणी करून घेणाऱ्या जोडप्यांचे धाबे दणाणले आहेत.