मुलीच्या खुनाची वडिलांकडून कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:31 IST2021-08-18T04:31:15+5:302021-08-18T04:31:15+5:30
कुरुंदवाड : वागण्यात बदल होत नसल्यानेच मुलगीला नदीत ढकलून दिल्याची कबुली मृत साक्षी काटकरचे वडील दशरथ रामचंद्र काटकर (वय ...

मुलीच्या खुनाची वडिलांकडून कबुली
कुरुंदवाड : वागण्यात बदल होत नसल्यानेच मुलगीला नदीत ढकलून दिल्याची कबुली मृत साक्षी काटकरचे वडील दशरथ रामचंद्र काटकर (वय ४२, रा. दत्तवाड, ता. शिरोळ) याने कुरुंदवाड पोलिसात दिली आहे. त्यामुळे बापाविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे, तर आणखी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी दशरथ हा यंत्रमाग कामगार आहे. त्याची मुलगी साक्षी (वय १७) हिचे गावातील एका तरुणाशी प्रेमप्रकरण होते. हे प्रकरण मान्य नसल्याने तिचे सांगलीतील तरुणाशी लग्न लावून दिले होते. मात्र, साक्षी सासरीही प्रियकराबरोबर संपर्कात राहत असल्याने काही दिवसांपूर्वी नवऱ्यानेही सोडपत्र घेतले होते.
साक्षीच्या या प्रकरणामुळे घरात वारंवार भांडणे होत असल्याने काही दिवसांपूर्वी साक्षी सांगलीतील मावशीकडे गेली होती. मात्र, मुलगीच्या या प्रकरणाने मानसिक संतुलन बिघडलेल्या दशरथने शुक्रवारी (दि. १४) सांगली येथे जाऊन मुलगीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती प्रियकराला सोडण्यास तयार नसल्याने तिला दुचाकीवरून घेऊन दत्तवाडकडे निघाला.
दानवाड कृष्णा नदीच्या पुलावर येताच आरोपी दशरथने पुन्हा तिला प्रियकराला सोड नाही तर नदीत ढकलून देण्याची भीती घातली. मात्र, साक्षी तयार नसल्याने रागाच्या भरात तिला नदीपात्रात ढकलून देऊन पुन्हा सांगलीला गेला.
शनिवारी संशयित आरोपी दशरथने कुरुंवाड पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. रविवारी पोलिसांनी दशरथला चौकशीसाठी बोलावले असता संशय आल्याने व पोलिसी खाक्या दाखवताच मुलगीला नदीत ढकलून दिल्याची कबुली दिली होती. त्यामुळे वजीर रेस्क्यू फोर्सच्या साहाय्याने नदीपात्रात शोध घेतला असता सोमवारी कल्लोळ (ता. चिकोडी) येथील नदीपात्रात साक्षीचा मृतदेह आढळून आला होता. अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील करीत आहेत.
फोटो - १७०८२०२१-जेएवाय-०६-संशयित दशरथ काटकर