बँकेची सोय नसल्याने तेरणी परिसरातील नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:26 IST2021-09-26T04:26:23+5:302021-09-26T04:26:23+5:30

तेरणी गावात ‘एटीएम’ची ही सोय नाही. तेरणी ग्रामपंचायतीने नुकतीच हसन मुश्रीफ यांच्याकडे गावात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेची मागणी ...

The condition of the citizens of Terani area due to lack of bank facilities | बँकेची सोय नसल्याने तेरणी परिसरातील नागरिकांचे हाल

बँकेची सोय नसल्याने तेरणी परिसरातील नागरिकांचे हाल

तेरणी गावात ‘एटीएम’ची ही सोय नाही. तेरणी ग्रामपंचायतीने नुकतीच हसन मुश्रीफ यांच्याकडे गावात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेची मागणी केली आहे. मात्र, एक वेळ येथे असलेली शाखा बंद केल्याने पुन्हा या ठिकाणी ही सोय होईल याची शाश्वती वाटत नाही.

परिसरातील राष्ट्रीयीकृत बँकेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास हलकर्णीतील आय.डी.बी.आय. वगळता या परिसरात एकही बँक नाही.

तेरणी येथील लघु पाटबंधारे तलाव सलग तीन वर्षे तुडुंब भरल्याने परिसरात ऊस, भाजीपाल्याची पिके जोमात आहेत. गावात आर्थिक सुबत्ता दिसून येते. मात्र, शेतकरी वर्गाला आर्थिक आधार ठरणारी जिल्हा बँक किंवा राष्ट्रीयीकृत बँक या परिसरात नाही. साधारण ६ हजार लोकसंख्या असलेले तेरणी हे गाव राष्ट्रीयीकृत बँकेसाठी पोषक असूनही याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे बँक ग्राहकांना बँक कामासाठी हलकर्णीत पूर्ण दिवस काढावा लागत आहे.

लॉकडाऊनच्या काळात एसटी बसची सोय नसल्याने अनेकांना किसान सन्मान योजनेसह अन्य बँक सेवेचा लाभ घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

चौकट :

वयोवृद्ध, निराधार लाभार्थ्यांचे हाल

तेरणीसह बुगडीकट्टी, कवळीकट्टी तेगिनहाळ या चार गावांतील इंदिरा गांधी, संजय गांधी निराधार योजना व किसान सन्मान योजनेतील वयोवृद्ध नागरिकांना प्रवास व वेळ खर्च करीत पूर्ण दिवस हलकर्णीत ताटकळावे लागते. सध्या बँका अपुऱ्या कर्मचारी समस्यांना तोंड देत आहेत. त्यामुळे हलकर्णीतील बँक शाखांत गर्दीचे चित्र असते. त्यामुळे महिला खातेदारांसह वृद्ध खातेदार यांना मोठा त्रास सोसावा लागतो.

चाैकट :

...तर या गावांची होईल सोय

तेरणी (लोकसंख्या ६ हजार), कवळीकट्टी (१९००), बुगडीकट्टी (२४००), तेगिनहाळ (८००) अशी साधारण १० हजारांवर लोकसंख्या असलेल्या भागासाठी तेरणी येथे जिल्हा बँक शाखा किंवा राष्ट्रीयीकृत बँक झाल्यास वरील गावांच्या नागरिकांची मोठी सोय होणार आहे. या गावांसाठी तेरणी हे सेंटर असून वरील सर्व गावांतील ग्राम पदाधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न करून संबंधित प्रस्ताव ज्या त्या बँकांकडे पाठवणे गरजेचे आहे. जेणेकरून वेळ व वाचेल. महिला व वृद्ध ग्राहकांची सोय होईल.

Web Title: The condition of the citizens of Terani area due to lack of bank facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.