शाहू साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

By Admin | Updated: May 7, 2015 00:40 IST2015-05-07T00:35:33+5:302015-05-07T00:40:00+5:30

कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप : दहा लाख साखर पोती उत्पादन

The conclusion of the crushing season of the Shahu sugar factory | शाहू साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

शाहू साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

कागल : येथील छ. शाहू सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता झाली. या हंगामात १७१ दिवसांत आठ लाख पाच हजार १२२ मेट्रिक टन उसाचे गाळप करीत सरासरी १२.७१ टक्के साखर उतारा घेत एकूण दहा लाख २४ हजार ४६० साखरपोत्यांचे उत्पादन केले आहे. कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप करूनच हंगामाची सांगता करण्यात आली आहे.
सन २०१४-१५ मध्ये हंगाम कालावधी वाढला आहे. कारण अनेक शेतकऱ्यांनी पुरवणी करार केले. तसेच इतर ठिकाणी उसाची विल्हेवाट न लावता शाहू साखर कारखान्यास ऊस पाठविण्याबद्दल आग्रही राहिले. हे सर्व शेतकरी कारखाना कार्यक्षेत्रातील असल्याने कारखान्याने सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न केला. तसेच अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळेही हंगामाचे दिवस वाढले, असे कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हंगामाच्या सुरुवातीला साखरेचे दर प्रति क्विंटल २७०० ते २८०० होते. परंतु, नंतर साखरेचे दर घसरले. आज ते प्रति क्विंटल २३०० रुपये इतके खाली आले आहेत. तरीही कारखान्याचे दिवंगत अध्यक्ष विक्रमसिंहजी घाटगे यांच्या आर्थिक नियोजनामुळे शाहू साखर कारखान्याने पहिली उचल २५३० रुपये प्रतिटन दर पंधरवड्यास दिली आहे. त्यासाठी कारखान्याने राखून ठेवलेल्या रिझर्व्ह फंडाचा उपयोग झाला आहे. कारखान्याने १५ मार्च अखेरच्या उसाची बिले अदा केली आहेत. ३१ मार्चअखेर आलेल्या उसाची रक्कम लवकरच बँकेकडे वर्ग करणार आहोत.
या हंगामात कारखान्याच्या सहवीज प्रकल्पातून चार कोटी युनिट वीज विक्रीचे उद्दिष्ट ठेवले होते. १८० दिवसांत सात कोटी ४२ लाख ९७ हजार युनिट विजेची निर्मिती केली आहे. अजूनही हा प्रकल्प पंधरा दिवस चालणार आहे, तर डिस्टिलरी प्रकल्पात १७३ दिवसांत ९७ लाख १० हजार लिटर स्पिरिटचे उत्पादन झाले आहे, असेही कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

दृष्टिक्षेप
८ लाख ५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप
१२.७१ टक्के उतारा
सात कोटी ४२ लाख ९७ हजार युनिट विजेची निर्मिती
९७ लाख १० हजार लिटर स्पिरिटचे उत्पादन

Web Title: The conclusion of the crushing season of the Shahu sugar factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.