चौंडेश्वरी बॅँकेच्या विशेष सभेबाबत संभ्रमावस्था

By Admin | Updated: June 7, 2016 07:34 IST2016-06-07T07:32:04+5:302016-06-07T07:34:42+5:30

जनता बँकेचे अधिकारी फिरकलेच नाहीत : विलीनीकरणाचा पुनर्विचार करण्यासाठी सभासदांची शुक्रवारी सभा

Concerned about the special meeting of the bank in Chundeshwari | चौंडेश्वरी बॅँकेच्या विशेष सभेबाबत संभ्रमावस्था

चौंडेश्वरी बॅँकेच्या विशेष सभेबाबत संभ्रमावस्था

इचलकरंजी : येथील चौंडेश्वरी सहकारी बॅँक विलीन करून घेण्यासाठी पुणेस्थित जनता सहकारी बॅँकेचे अधिकारी आलेच नाहीत; तर बॅँक विलीनीकरणाचा पुनर्विचार करण्यासाठी चौंडेश्वरी बॅँकेच्या सभासदांची १० जूनला विशेष सभा आयोजित केली आहे. अशा परस्परविरोधी प्रकारामुळे बॅँकेच्या सभासदांत मात्र संभ्रमावस्था आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा असे तीन जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या चौंडेश्वरी बॅँकेचे १५,९५२ सभासद आहेत. बॅँकेच्या प्रधान कार्यालयासह इचलकरंजीत तीन, कोल्हापूर, गांधीनगर, जयसिंगपूर, गडहिंग्लज, सांगली व कऱ्हाड अशा नऊ शाखा आहेत. बॅँकेस रिझर्व्ह बॅँकेने २० आॅगस्ट २०१४ पासून आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. चौंडेश्वरीकडे १९ कोटी रुपयांच्या ठेवी, ४.१६ कोटी रुपये कर्ज वितरण, तर १६.७२ कोटी रुपये तोटा आहे. बॅँक विलीनाची प्रक्रिया सुमारे दोन वर्षे सुरू आहे. त्यानंतर गतवर्षी जून महिन्यामध्ये पुणे येथील जनता सहकारी बॅँकेमध्ये चौंडेश्वरी बॅँक विलीन करण्याचा प्रस्ताव जनता बॅँकेच्या विशेष सभेमध्ये मंजूर झाला. त्याच्या अनुषंगाने आॅगस्ट महिन्यामध्ये चौंडेश्वरी बॅँकेच्या सभासदांची विशेष सभा झाली. या सभेमध्ये ‘चौंडेश्वरी’ जनता सहकारी बॅँकेमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव संमत झाला. दरम्यान, जानेवारी २०१६ मध्ये चौंडेश्वरी बॅँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची निवडणूक झाली.
निवडणुकीला पाच महिने उलटले असतानाच इकडे जनता सहकारी बॅँकेने सहकार आयुक्तांकडून चौंडेश्वरी बॅँकेचे जनता बॅँकेत विलीनीकरणाचे आदेश घेतले. हा आदेश ४ जुलै २०१६ पासून लागू होणार असला तरी जनता बॅँकेने आपले सात अधिकारी चौंडेश्वरी बॅँकेच्या सात शाखांवर ६ जूनपासून पाठवून देत असल्याचे चौंडेश्वरी बँकेला कळविले. तरी त्यांना संपूर्ण सहकार्य करावे, असेही एका पत्रान्वये सांगितले. त्याप्रमाणे सोमवारी जनता बॅँकेचे अधिकारी येण्याची प्रतीक्षा संचालक विठ्ठलराव डाके व त्यांचे सहकारी करीत होते. मात्र, सायंकाळपर्यंत जनता बॅँकेचे अधिकारी आलेच नाहीत. (प्रतिनिधी)

‘चौंडेश्वरी’वर ‘बुलढाणा’चे वर्चस्व
जानेवारी २०१६ मध्ये चौंडेश्वरी बॅँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली.
ही बॅँक पुनरुज्जीवित करण्याच्या अपेक्षेने बुलढाणा अर्बन को-आॅप. क्रेडिट सोसायटीच्या संचालकांनी ‘चौंडेश्वरी’च्या निवडणुकीमध्ये थेट सहभाग नोंदविला. चौंडेश्वरी बँकेची निवडणूक बिनविरोध करून बॅँकेच्या १५ संचालकांपैकी ११ संचालक ‘बुलढाणा’शी निगडित असलेले, तर चार संचालक इचलकरंजीचे झाले. त्यानंतर बॅँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत चौंडेश्वरी बॅँकेच्या अध्यक्षपदी राधेश्याम चांडक (जे बुलढाणा को-आॅप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष आहेत.) व उपाध्यक्षपदी श्यामसुंदर मर्दा यांची निवड करण्यात आली. अशा तऱ्हेने ‘चौंडेश्वरी’वर ‘बुलढाणा’चे वर्चस्व प्रस्थापित झाले.

Web Title: Concerned about the special meeting of the bank in Chundeshwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.