संगणक सेवक मानधनाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: March 17, 2016 23:44 IST2016-03-17T23:10:05+5:302016-03-17T23:44:05+5:30
संग्राम योजना बंद : बेकारीची कुऱ्हाड, ग्रामपंचायतींमधील संगणक सेवा कोलमडली

संगणक सेवक मानधनाच्या प्रतीक्षेत
राहुल मांगुरकर --अर्जुनवाड --कॉँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेली संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) ही योजना ३१ डिसेंबरपासून भाजप सरकारने बंद केली आहे. राज्यात २७ हजार संगणक सेवक म्हणून संग्राम योजनेअंतर्गत कार्य करीत होते. त्यांच्यावर जानेवारी २०१६ पासून बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तसेच आॅक्टोंबर ते डिसेंबर २०१५ या कालावधीतील मानधन न मिळाल्याने आर्थिक आरिष्टात संगणक सेवक सापडला आहे.कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सन २०११ साली शासनाने राज्यातील ग्रामपंचायती बळकटीकरण करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीस संगणक, स्कॅनर, प्रिंटर, इंटरनेट सुविधा दिल्या होत्या. तसेच संगणक परिचालक नेमून ई-गव्हर्नस बरोबर रोजगाराला चालना दिली होती. यामुळे ग्रामपंचायतीला चांगल्या प्रकारे बळकटीकरण येऊन प्रत्येक गावाची माहिती वेबसाईटद्वारे अद्ययावत करण्याबरोबर सर्वत्र एकसारखे संगणकीयकृत दाखले, जमा खर्च, योजना, आदी कामकाज संगणकाद्वारे चालत होते. जन्म, मृत्यू, घरांची मालमत्ता नोंदणी, आदी कामकाज चालत होते. या योजनेसाठी १३ वा वित्त निधी उपयोगी ठरला होता.
मात्र, १३ वा वित्त आयोगाचा हा निधी काही दिवसांपूर्वी संपला, तर काही ग्रामपंचायतीकडे निधी शिल्लक असल्याने त्यांना वारंवार मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानंतर १४ व्या वित्त आयोगाची स्थापना केली. मात्र, यामध्ये संग्राम योजनेकडे राज्य शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. भाजप सरकारने १४ व्या आयोगाची रक्कम थेट ग्रामपंचायतीला देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये संग्राम योजनेला थारा दिला नसल्याने घरघर लागली आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील संगणक संच धुळखात पडून असून, इंटरनेट बिलही विनाकारण भरावे लागत आहे. संगणक परिचालकावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
आॅक्टोबर ते डिसेंबरचे मानधन थकीत
या योजनेत काम केलेल्या संगणक परिचालकांचे माहे आॅक्टोबर १५ ते डिसेंबर १५ चे मानधन आजही थकीत आहे. यासाठी संघटना व परिचालकांनी शासनाकडे मागणी करूनही या योजनेकडे दुर्लक्ष करण्याबरोबरच त्यांच्या थकित मानधनाकडे पाठ फिरविली. तसेच संगणक परिचालकांनी महाआॅनलाईन कंपनीशी संपर्क साधण्याची सूचना कार्यासन अधिकारी अर्चना वालझाडे यांनी दिली.
संगणक सेवक आर्थिक आरिष्टात
महाआॅनलाईन कंपनी, टाटा कन्सल्टन्सी व शासनाच्या या गोंधळात संगणक सेवक आर्थिक आरिष्टात सापडला आहे. हाताला काम नाही, मागचे थकीत मानधन मिळत नाही. येथून पुढे काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर ‘आ’ वासून उभा आहे.