काटा काढण्यासाठी तडजोडीच तडजोडी
By Admin | Updated: October 13, 2014 00:48 IST2014-10-13T00:47:16+5:302014-10-13T00:48:23+5:30
‘शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र’ या न्यायाने सगळीकडे तडजोडीच

काटा काढण्यासाठी तडजोडीच तडजोडी
कोल्हापूर : विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान काही तासांवर आले असल्याने विरोधी उमेदवाराचा काटा काढण्यासाठी प्रत्येक मतदारसंघांत ‘सोयीच्या राजकारणा’ला ऊत आला आहे. ‘शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र’ या न्यायाने सगळीकडे तडजोडीच तडजोडी सुरू झाल्या आहेत. ज्यांनी आपले पत्ते आजपर्यंत खुले केले नव्हते, त्यांनी उघडपणे भूमिका घ्यायला सुरुवात केल्याने कोण कुणाच्या बाजूने उभा राहणार हेदेखील स्पष्ट होऊ लागले आहे.
‘कोल्हापूर उत्तर’मध्ये मुख्यत: कसबा बावड्यात आज दुपारपासूनच काँग्रेसचे कार्यकर्ते मोबाईलवर बोलतानाही ‘जय महाराष्ट्र’ म्हणून सुरुवात करीत होते. त्यामुळे ‘कोल्हापूर दक्षिण’च्या लढतीचे पडसाद या मतदारसंघात काँग्रेसच्या अडचणी वाढविणार असल्याचे स्पष्ट झाले. त्याबदल्यात ‘दक्षिण’मधील भगवा कार्यकर्ता हातात ‘हात’ घ्यायला तयार झाल्याची चर्चा सुरू होती. लोकसभा निवडणुकीतील पैरा फेडायचा म्हणून महाडिक गटही एकाच मतदारसंघातील परस्परविरोधी दोन उमेदवारांना छुपा पाठिंबा देत असल्याचेही चित्र दिसते आहे. दुसरीकडे कालच एलबीटीच्या प्रश्नावरून व्यापाऱ्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. त्यांनी ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये शिवसेनेला, तर ‘दक्षिण’मध्ये मात्र भाजपला पाठिंबा दिला आहे. आमच्या प्रश्नांसाठी लढणारा उमेदवार व प्रश्न सोडविणारा पक्ष म्हणून दोन ठिकाणी दोन वेगवेगळ््या उमेदवारांना पाठिंबा दिल्याचे संघटनेचे नेते सांगत आहेत.
करवीर मतदारसंघात आजच्या दिवसांपर्यंत ‘जनसुराज्य’चा नारळ म्हणणारी राष्ट्रवादी काही गावांत अचानक ‘धनुष्यबाण की जय’ म्हणताना दिसत आहेत. मुख्यत: भोगावती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अशा कोलांटउड्या सुरू झाल्या आहेत. पक्षाच्या नेत्यांनी अशी भूमिका घेतल्याने नेत्यांना सोडून प्रमुख कार्यकर्ते परस्पर काँग्रेसला पाठिंबा देऊ लागले आहेत.‘राष्ट्रवादी’च्या करवीरमधील भूमिकेचे पडसाद शेजारच्या राधानगरी मतदारसंघात उमटण्याची चिन्हे आहेत. त्या मतदारसंघातील शेकापचा गट घड्याळ सोडून देऊन ‘शिवसेना की जय’ असे म्हणण्याच्या तयारीत आहे. मुळातच या मतदारसंघात प्रस्थापितांच्या विरोधात जोरदार लाट वाहत असून, सगळ््या मतदारसंघांत धनुष्यबाणाचे वारे वाहत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. (प्रतिनिधी)
बहुतांश मतदारसंघांत शेवटच्या टप्प्यात दुरंगीच लढतीचे चित्र पुढे आल्याने रिंगणातील तिसऱ्या,चौथ्या क्रमांकावरील उमेदवाराच्या मतांवर डल्ला मारण्यासाठी व्यूहरचना काम करू लागली आहे.