राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या पहिल्यादिवशी संमिश्र सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST2020-12-30T04:31:29+5:302020-12-30T04:31:29+5:30
मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन, रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्यावतीने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. पहिल्या सत्रात मल्हार ग्रुप, ...

राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या पहिल्यादिवशी संमिश्र सादरीकरण
मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन, रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्यावतीने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. पहिल्या सत्रात मल्हार ग्रुप, इचलकरंजी या संघाने ''''शिकवण'''' ही एकांकिका सादर केली. परंपरागत व्यवसाय स्वीकारायचा की शिक्षणाची वाट पकडून नवीन आयुष्य जगायचे, या प्रश्नाचा वेध या एकांकिकेने घेतला. जीवनज्योत नाट्यसंस्था, नवी मुंबई या संघाने ''''पूर्णविराम'''' या एकांकिकेत मानवी भावभावना आणि जन्म-मृत्यूशी झुंजत असलेल्या एका कलाकाराची कथा सांगितली आहे. अहिल्या थिएटर्स, मुंबई संघाने ''''कॉट नंबर २७'''' या एकांकिकेत कोविड साथीमुळे उद्भवलेली मेडिकल स्टाफची धांदल व त्याची जबाबदारी दाखवणारी होती. तसेच यामध्ये राजकारणही कसे झाले, याचे वास्तव मांडले.
दुसऱ्या सत्रात नटेश्वर कलाविष्कार, मुंबई संघाने ''''आरण्यक'''' ही एकांकिका सादर केली. एक मनोविकार तज्ज्ञ आणि पती-पत्नीची जोडी याच्या संबंधावरील गूढ आशयाची ही एकांकिका होती. त्यानंतर अहमदनगर या संघाने ''''दोरखंड'''' ही एकांकिका प्रभावीपणे सादर केली. जगात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रवृत्ती आहेत; पण वाईट बळावली, तर चांगल्या प्रवृत्तीच्या लोकांनी एकजूट करून त्याचा प्रतिकार करायला हवा, असा संदेश या एकांकिकेने दिला.
पहिल्यादिवशी अखेरच्या सत्रात गडहिंग्लज कला अकादमी संघाने ''''बोले पोपट'''' ही एकांकिका सादर केली. अहमदनगरच्या पहिलं प्रॉडक्शन संघाने ''''शादी का माहोल'''' या एकांकिकेत लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं एकत्रित येणं असतं. यामध्ये विनाकारण मुलाची बाजू मोठी आणि मुलीची बाजू छोटी असा भेद असू नये, असा आशय मांडला आहे. शेवटची ''''पाझर'''' ही एकांकिका ब्लॅक बॉक्स थिएटर्स, इचलकरंजी संघाने सादर केली. नवीन पिढी आणि जुन्या पिढीमध्ये मतभेद असू शकतात; पण नवीन पिढीने जुन्या पिढीला समजून घेण्याची गरज असल्याचे या एकांकिकेमध्ये दाखविले आहे. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सुरू असलेल्या पहिल्यादिवशी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
(फोटो ओळी)
२८१२२०२०-आयसीएच-०५
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत पहिल्यादिवशी अहमदनगर या संघाने ''''दोरखंड'''' ही एकांकिका प्रभावीपणे सादर केली.