ध्वजनिधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण
By Admin | Updated: December 12, 2014 00:35 IST2014-12-12T00:20:30+5:302014-12-12T00:35:26+5:30
राजाराम माने : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास प्रारंभ

ध्वजनिधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण
कोल्हापूर : जिल्ह्याला ध्वजनिधी संकलनाचे असणारे एक कोटी १३ लाखांचे उद्दिष्ट १०१ टक्के पूर्ण केले आहे. ध्वजनिधी संकलनामुळे समाजात सैनिकांबद्दल सद्भावना निर्माण होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी व्यक्त केले.
कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये सशस्त्र सेना ध्वजदिननिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे आयोजित ‘सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन प्रारंभ २०१४ व विजय दिवस’ या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी माने बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, स्टेशन कमांडर कोल्हापूर कर्नल राहुल वर्मा, मेजर जनरल शिवाजीराव पाटील, मेजर जनरल ए. बी. सय्यद, मेजर जनरल मधुकर काशीद, ब्रिगेडियर व्ही. जी. घोरपडे, रूपा शहा आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी माने म्हणाले, ध्वजदिन निधीतून सैनिक परिवारासाठी कल्याणकारी उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येतात. वैद्यकीय, शैक्षणिक मदत, मुलींच्या विवाहासाठी मदत, घरबांधणी अनुदान, बचतगटांना निधी, आदी उपक्रम राबविले जातात. या निधीतून सैनिक, माजी सैनिक, वीर माता-पिता, शहीद सैनिकांचे वारस यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवून अर्थसाह्य केले जाते.
यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विशेष कामगिरी करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ‘ध्वजदिन निधी २०१३’ मध्ये उत्कृष्ट निधी संकलनाचे कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. जिल्हाधिकारी माने यांच्या हस्ते ‘ध्वजदिन निधी २०१४’ संकलनाचा प्रारंभ करण्यात आला.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल सुहास नाईक यांनी प्रास्ताविक केले. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार व ए. बी. सय्यद यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी सैनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पुढच्या वर्षी एक कोटी २४ लाखांचे उद्दिष्ट...
पुढील वर्षी ध्वजनिधी संकलनाचे जिल्ह्याचे एक कोटी २४ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. दुसऱ्या महायुद्धातील जिल्ह्यातील ७७५ माजी सैनिकांना दरमहा तीन हजार रुपये देतो, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल सुहास नाईक यांनी प्रास्ताविकात सांगितले.