जिल्ह्यातील आठ गावांतील पाणलोटांची तपासणी पूर्ण
By Admin | Updated: July 21, 2015 01:44 IST2015-07-21T01:44:31+5:302015-07-21T01:44:31+5:30
दोन खास पथके : चार वर्षांतील प्रकल्पांची चौकशी

जिल्ह्यातील आठ गावांतील पाणलोटांची तपासणी पूर्ण
विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर
गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ४१७ गावांतील २९८ पाणलोट प्रकल्पांपैकी पहिल्या टप्प्यांतील आठ गावांतील कामांची चौकशी सोमवारी पूर्ण झाली. अशी चौकशी एकूण चार टप्प्यांत होणार असून त्याचा अहवाल थेट विधिमंडळाला सादर होणार आहे. त्याची मुदत २७ जुलैपर्यंत असली तरी तोपर्यंत गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचे काम जास्त असल्याने हा अहवाल लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्पामध्ये (वसुंधरा पाणलोट) जिल्ह्यातील कामांत सुमारे ३० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार विधानसभेत १८ जुलैला झाली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीने दोन पथके करून ही चौकशी सुरू केली आहे. कृषी महाविद्यालयातील कृषी अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रोफेसर रविकिरण माने, अफार्म पुणे संस्थेचे जिल्हा अभियांत्रिकी संंपर्क अधिकारी प्रदीप साळवे व लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील यांचे प्रतिनिधी हे पाणलोटांची प्रत्यक्ष जाग्यावर जावून पाहणी व खर्च झालेला निधी, कामाचा दर्जा याची चौकशी करत आहेत. जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी सागर वाळवेकर आणि पाणीपुरवठा व जल:निस्सारण विभागाचे सहाय्यक लेखाधिकारी अरुण मांगलेकर यांचे पथक या कामांच्या कागदपत्रांची छाननी करत आहे. अतिरिक्त प्रकल्प व्यवस्थापक(वसुंधरा प्रकल्प) हणमंत इंगवले हे समितीचे सदस्य सचिव आहेत.
या कामातील गैरव्यवहाराबद्दल वृत्तपत्रांनी झोड उठवलीच शिवाय त्यासंबंधीची तक्रार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही झाली होती. आठ गावांतील कामांची पाहणी केल्यावर कामे झाली आहेत, त्यासाठीचे साहित्यही जाग्यावर आहे परंतु या कामांचा हिशेब ठेवण्यात हयगय झाल्याचे आढळल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.