उद्धव गोडसेकोल्हापूर : जादा परतावा देण्याचे आमिष सुमारे २३०० कोटींची फसवणूक करणाऱ्या एएस ट्रेडर्स कंपनीच्या विरोधात गेल्या अडीच वर्षांत केवळ ६३७ गुंतवणूकदारांनी तक्रारी दिल्या. त्यांच्या फसवणुकीचा आकडा ५० कोटी ८० लाख ६१ हजारांवर पोहोचला आहे. या गुन्ह्यातील २० आरोपींना अटक झाली असून, अजूनही १६ आरोपींचा शोध सुरूच असल्याची माहिती पोलिसांनी दिली.शेअर मार्केट, बिटकॉइन यासह विविध प्रकारच्या गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एएस ट्रेडर्स कंपनीवर नोव्हेंबर २०२२ मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सुरुवातीला २६ आरोपींचा समावेश होता. पोलिसांच्या तपासात आणखी १३ आरोपींची नावे निष्पन्न झाली. एकूण ३९ आरोपींपैकी २० जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.यात गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आणि कंपनीचा प्रमुख लोहितसिंग सुभेदार याचाही समावेश आहे. २० पैकी पाचजणांना जामीन मंजूर झाला असून, सध्या १५ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. तीन आरोपींना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करून घेतला. उर्वरित १३ आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.एसएस ट्रेडर्स कंपनीसह तिच्या संलग्न कंपन्यांमध्ये सुमारे अडीच हजारांहून जास्त गुंतवणूकदारांनी २३०० कोटींची गुंतवणूक केल्याचे तपासात समोर आले. अजूनही अनेक तक्रारदार पोलिसांपर्यंत पोहोचलेच नाहीत. त्यामुळे फसवणुकीचा आकडा मर्यादित राहिला आहे.२० जणांवर आरोपपत्र दाखलमुख्य सूत्रधार सुभेदार याच्यासह सुवर्णा सरनाईक, बाबासो धनगर, बाळासो धनगर, अमित शिंदे, श्रृतिका सावेकर, आशिष गावडे, साहेबराव शेळके, नामदेव पाटील, दत्तात्रय तोडकर, रोहित उर्फ गुंड्या घेवडे, राजेश पाडळकर, महेश शेवाळे, प्रतापसिंग शेवाळे, दीपक मोहिते, विक्रम नाळे यांच्यासह एकूण २० जणांवर न्यायालयात मूळ व पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आहे.तक्रारदारांनाच नुकसानभरपाई मिळणारमोठी व्याप्ती असलेल्या गुन्ह्यात केवळ ६३७ गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्या. काहीतरी तडजोड होऊन पैसे मिळवता येतील या विचाराने अनेकांनी तक्रारी देणे टाळले. शिवाय तक्रार दिल्यावर नाव प्रसिद्ध होईल, त्यातून बदनामी होईल असेही वाटल्याने अनेकांनी तक्रारी दिलेल्या नाहीत. काही सरकारी नोकरदारांनी गुंतवलेले पैसे आणले कोठून हे सांगावे लागेल म्हणूनही गप्प राहणे पसंत केले. तक्रार नसल्याने ते नुकसानभरपाईसाठी पात्र ठरणार नाहीत. ज्यांनी तक्रार दिली त्यांनाच नुकसानभरपाई मिळेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.लाभार्थींची चौकशी सुरूएएस ट्रेडर्समधून जादा परतावा मिळवलेल्या गुंतवणूकदारांची यादी पोलिसांनी काढली आहे. मोठ्या रकमेचे परतावे, फ्लॅट, वाहने, परदेशी सहली असे लाभ घेतलेल्या गुंतवणूकदारांची चौकशी केली जाणार आहे. गुंतवणुकीपेक्षा जास्त घेतलेला लाभ त्यांच्याकडून वसूल केला जाईल, असे पोलिस निरीक्षक कळमकर यांनी सांगितले.
- एकूण आरोपी - ३९
- अटक आरोपी - २०
- जामीन मंजूर - ५
- शोध सुरू असलेले आरोपी - १६
- अटकपूर्व जामीन मिळवलेले आरोपी - ३
- मालमत्ता जप्त - २१ कोटी ७५ लाख ५९ हजार ८५८ रुपयांची
- लूक आऊट नोटीस - ९ आरोपींविरोधात
Web Summary : AS Traders' Kolhapur scam, promising high returns, totals ₹50 crore. Only 637 investors complained. Police arrested 20; 16 remain at large. Many feared revealing income sources.
Web Summary : एएस ट्रेडर्स का कोल्हापुर घोटाला, उच्च रिटर्न का वादा, कुल 50 करोड़ रुपये। केवल 637 निवेशकों ने शिकायत की। पुलिस ने 20 को गिरफ्तार किया; 16 अभी भी फरार हैं। कई लोगों को आय के स्रोत का खुलासा करने का डर था।