अब्दुललाट सरपंचविरोधात पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST2021-04-30T04:29:54+5:302021-04-30T04:29:54+5:30
अब्दुललाट (ता. शिरोळ) : येथील ग्रामपंचायतीने शेतकरी अभ्यासदौऱ्याचा बोगस खर्च दाखवून दीड लाखाचा अपहार केल्याचे उघडकीस आला आहे. ...

अब्दुललाट सरपंचविरोधात पोलिसांत तक्रार
अब्दुललाट (ता. शिरोळ) : येथील ग्रामपंचायतीने शेतकरी अभ्यासदौऱ्याचा बोगस खर्च दाखवून दीड लाखाचा अपहार केल्याचे उघडकीस आला आहे. त्यामुळे सरपंच पांडुरंग सिद्राम मोरे-भाट यांना या अपहाराला जबाबदार धरून त्यांच्याविरोधात शिरोळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर. एस. कांबळे यांनी कुरुंदवाड पोलिसांत तक्रार दिली आहे. याबाबतची तक्रार संजय आण्णासो कोळी यांच्यासह आठ ग्रामस्थांनी केली होती. या प्रकाराने खळबळ उडाली असून ग्रामपंचायतीने ग्रामस्थांची फसवणूक केल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामपंचायतीने २०१८-१९ सालात १४ व्या वित्त आयोगातून शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी राळेगणसिद्धी व बारामती गावांची निवड केली होती. त्यासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या खात्यावरून टूर ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या नावे एक लाख ५० हजार रुपयांची उचल केली होती.
मात्र प्रत्यक्षात सहल काढलीच नाही. बोगस कागदपत्रे दाखवून रक्कम खर्ची दाखविण्यात आल्याची तक्रारदार कोळी यांनी तक्रार केल्याने शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी चौकशीसाठी विस्तार अधिकारी कांबळे यांची नियुक्ती केली होती.
चौकशीत सहल बोगस दाखविल्याचे सिद्ध झाल्याने सरपंच मोरे-भाट यांनी टूर ॲण्ड ट्रॅव्हल्स कंपनीकडून व्याजासहीत एक लाख ६१ हजार ३४५ रुपये वसूल केल्याचे दाखवून ९ मार्च रोजी भरले होते. सहलीत एकूण ५१ शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यामध्ये एका शिक्षकाचे नाव होते. मात्र सहलीत दाखविण्यात आलेल्या कालावधीत शिक्षकाच्या शाळेतील हजेरी मस्टरवर त्याची सही असल्याने बोगस सहल झाल्याचे सिद्ध झाले होते. शिवाय सहलीच्या यादीमध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या घरांतील व्यक्तींच्याच नावांचा समावेश केल्याने अपहार सामूहिक झाल्याचे स्पष्ट होत आहे.
अभ्यासदौऱ्याच्या नावावर ग्रामपंचायतीने भ्रष्टाचार केल्याने सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सदस्यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत सरपंच भाट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.