बांधकाम परवान्यासाठी लागतो आठ महिन्यांचा वेळबांधकाम व्यावसायिकांची तक्रार : मंजूरी प्रक्रिया लवकर झाल्यास महापालिकेलाच लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST2021-01-17T04:22:44+5:302021-01-17T04:22:44+5:30
कोल्हापूर : महापालिकेत कोणत्याही प्रकल्पाच्या बांधकाम परवान्यासाठी अर्ज केला आणि सातत्याने पाठपुरावा केली तरी किमान आठ महिन्यांच्या आत बांधकाम ...

बांधकाम परवान्यासाठी लागतो आठ महिन्यांचा वेळबांधकाम व्यावसायिकांची तक्रार : मंजूरी प्रक्रिया लवकर झाल्यास महापालिकेलाच लाभ
कोल्हापूर : महापालिकेत कोणत्याही प्रकल्पाच्या बांधकाम परवान्यासाठी अर्ज केला आणि सातत्याने पाठपुरावा केली तरी किमान आठ महिन्यांच्या आत बांधकाम परवाना मिळत नाही. ही परवाना देण्याची प्रक्रिया सुलभ आणि तत्पर केली तर त्यातून महापालिकेलाच चांगले उत्पन्न मिळू शकेल अशी अपेक्षा बांधकाम क्षेत्रातील नव्या पिढीतील व्यावसायिकांनी शनिवारी येथे व्यक्त केली. या सर्वांनी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली व बांधकाम क्षेत्रासमोरील अडचणी, त्यातील संधी याविषयीची मते व्यक्त केली.
कोल्हापुरातील सध्याचे जे नामवंत बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यांची पुढची पिढीही आता याच उद्योगात सक्रिय झाली आहे. अशा चौदा जणांनी हा संवाद साधला. त्यामध्ये विरेंद्र घाटगे, नंदकिशोर पाटील, अमोल देशपांडे, प्रतीक ओसवाल, मयुरेश यादव, बलराज पाटील, श्रीराम पाटील, प्रथमेश साळोखे, निखिल आगरवाल, आदित्य देशपांडे, रोहन आवटी, योजक रेडेकर, मौतिक पाटील, ऋषीकेश खोत यांचा समावेश होता. लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी स्वागत केेले व बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नांसाठी लोकमतचे व्यासपीठ सर्वांसाठी कायम खुले राहील अशी ग्वाही दिली. लोकमतचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख हे यावेळी उपस्थित होते.
एकात्मिक बांधकाम विकास नियमावलीमुळे या क्षेत्रातील जाचक अटी कमी झाल्या आहेत. त्याचा या क्षेत्राला चांगला फायदा होवू शकतो. राज्य शासनाने हा नक्कीच चांगला निर्णय घेतला, परंतु त्याचा लाभ मिळायचा असेल तर महापालिकेच्या पातळीवरही तितकेच चांगले सहकार्य मिळायला हवे. सध्या तसा अनुभव येत नाही. कोणतेही फाइल मंजुरीसाठी महापालिकेत सादर केली आणि रोज पाठपुरावा केला तरी किमान आठ महिने मंजुरीसाठी लागतात. अनेकदा फाइल गहाळ होते. प्राधिकरणाकडेही असाच अनुभव आहे. एवढा विलंब होण्याची विविध कारणे आहेत. ही प्रक्रिया गतीने झाली तर महापालिकेला त्यातून कांही कोटींचे उत्पन्न वर्षाला मिळू शकते. परंतु बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्प मंजुरीसाठीच दिव्यातून जावे लागते व प्रकल्प खर्चाच्या व्याजाचा भुर्दंड बसतो. पुण्यासह अन्य काही शहरांत ही प्रक्रिया ऑनलाइन आहे. तशी व्यवस्था कोल्हापुरात झाल्यास मोठी डोकेदुखी कमी होऊ शकेल अशा भावना या व्यावसायिकांनी व्यक्त केल्या.
आयटी हब...
कोल्हापुरात आयटी, पर्यटन क्षेत्रामध्ये विकासाची मोठी संधी आहे. पुण्या-मुंबईतील मोठ्या वर्गाला निवृत्तीनंतर कोल्हापुरात स्थायिक व्हावे असे वाटते. कोल्हापूरचे चांगले हवामान, सामाजिक शांतता यामुळे लोक या शहराला प्राधान्य देतात. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला चांगल्या संधी असल्याचे मत यावेळी व्यक्त झाले.
१६०१२०२१-कोल-युथ बिल्डर्स
कोल्हापुरातील बांधकाम क्षेत्रातील नव्या पिढीतील व्यावसायिकांनी शनिवारी लोकमतला सदिच्छा भेट दिली व बांधकाम क्षेत्रासमोरील अडचणी, त्यातील संधी याविषयीची मते व्यक्त केली. (आदित्य वेल्हाळ)