झोरेंसह चौघांविरोधात तक्रार
By Admin | Updated: August 19, 2014 23:42 IST2014-08-19T23:17:07+5:302014-08-19T23:42:59+5:30
दगडफेक प्रकरण : सहायक पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

झोरेंसह चौघांविरोधात तक्रार
इचलकरंजी : येथील नगरसेवक मदन झोरे यांच्या घरावर दगडफेक केल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित तिघांपैकी एकाने झोरे यांच्यासह चारजणांविरोधात मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी तक्रारदाराने चुकीची नावे दिली असून, याबाबत खात्री करूनच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत परिसरातील नागरिकांनी सहायक पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला.
अधिक माहिती अशी, काल, सोमवारी नगरसेवक झोरे यांच्या घरावर दगडफेक केल्याप्रकरणी झोरे यांनी येथील शिवाजीनगर पोलिसांत तिघांविरोधात तक्रार दिली आहे. दगडफेक करणाऱ्या तिघांना रोखून परिसरातील नागरिकांनी त्यांना मारहाण केली होती. यामध्ये जखमी झालेल्या दीपक दत्तात्रय सांगावकर (वय ३२, रा. साईनाथनगर) याने झोरे यांच्यासह विक्रम सुर्वे, महादेव हाळवणकर व अल्लाबक्ष बागवान (चौघे रा. शास्त्री सोसायटी) यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणात चोर सोडून संन्याशाला फाशी दिली जात आहे, असे म्हणत परिसरातील नागरिकांनी सहायक पोलीस अधीक्षक मकानदार यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्चातील प्रमुखांनी मकानदार यांच्याबरोबर चर्चा केली.
अटक केलेल्या संशयितांमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, परिसरात त्यांची दहशत आहे. अनेक महिला-पुरुषांना त्यांचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करा. तसेच त्यांनी दिलेल्या तक्रारीत तथ्य नसून नोंद केलेल्या नावाच्या व्यक्ती त्यावेळी भाजपच्या सार्वजनिक कार्यक्रमात गेल्या होत्या. त्यामुळे त्याची शहानिशा करूनच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. यावर मकानदार यांनी प्राथमिक नोंद घेतली असून, पोलीस तपास करूनच कारवाई करतील, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
बंद खोलीतील चर्चा
मोर्चातील प्रमुखांनी मकानदार यांची केबिनमध्ये भेट घेतली. यावेळी फोटोग्राफर व पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. फोटोग्राफरना फोटो काढण्यास विरोध करून बातमी लावू नका, असे खुद्द मकानदारच सांगत होते. या प्रकरणात प्रसारमाध्यमांना रोखण्याचे कारण काय, असा प्रश्न यावेळी उपस्थितांना पडला होता.