कोल्हापूर : शहराशेजारी आणि राष्ट्रीय महामार्गापासून जवळच असलेल्या गडमुडशिंगी (ता.करवीर) येथील सरकारी ३९ एकर जमिनीमध्ये प्लाटिंग सुरू असल्याची तक्रार गावातील तरुण मंडळांनी करवीर तहसीलदारांकडे केली आहे. लोकमत हेल्पलाइनकडेही त्याची प्रत पाठवली आहे. हे प्लाटिंग नसून शेती कसण्यासाठी योग्य व्हावे यासाठी मोजणी सुरू असून, त्याद्वारे हद्द निश्चित करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये मात्र मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.मुडशिंगीजवळील ही ३९ एकर जमीन तीन समाजांसाठी शाहू महाराजांनी दिली आहे. सध्या या ठिकाणी हद्दीचे छाेटे खांब पुरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे हे प्लॉटिंग सुरू असल्याचा संभ्रम निर्माण झाल्याने गावातील तरुण मंडळांनी कोणाचेही नाव न घालता करवीर तहसीलदारांना मंगळवारी निवेदन दिले. मात्र या निवेदनात या कामात कोण आहे त्यांचे, अभियंता, खांब पुरणाऱ्यांचीही नावे देण्यात आली आहेत. तसेच हे प्लॉटिंग पैसे घेऊन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला असून, एकीकडे वेळोवेळी गावसभेत मागणी करून क्रीडांगण मिळत नाही आणि या सरकारी जागेत प्लाॅटिंग कसे सुरू आहे, अशी विचारणा सुरू झाली आहे.
- ‘लोकमत’ने अधिक माहिती घेतली असता ही जमीन तीनही समाजाची असून, पीकपाण्याला १९४९ पासून या समाजांची नावे आहेत. या समाजातील प्रमुख पाच, पाच अशा पंधराजणांची नावे सात बाराला लागावीत असा प्रस्तावही या समाजाकडून मंडल अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
- परंतु तशी कोणाचीही नावे लावता येणार नाहीत असे मंडल अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर या ठिकाणी कोणालाच वैयक्तिक काही करता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असून तीनही समाजांनी सामूहिक पद्धतीने या जमिनीचा वापर उदरनिर्वाहासाठी करावयाचा असल्याचे स्पष्ट केले आहे.
कसण्यासाठी सोय व्हावी म्हणूनही जमीन समाजाची आहे हे सर्वांनाच मान्य आहे. परंतु कसण्यासाठी नेमकी कोणाला किती जमीन द्यायची यासाठी मोजमाप करून हद्द ठरवण्याचे काम सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात येत आहे. परंतू अशा पद्धतीने हद्द ठरवून परस्पर कसण्यापेक्षा महसूल प्रशासनाला सोबत घेऊनच हे काम करावे लागेल, असे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.
मुडशिंगीतील तीन समाजांसाठी ही जमीन देण्यात आली आहे. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी देण्यात आलेल्या या जमिनीचा कोणालाही वैयक्तिक वापर करता येणार नाही किंवा वैयक्तिक कोणाचीही नावे लावता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. तरीही नेमका त्या ठिकाणी काय प्रकार सुरू आहे याची उद्या माहिती घेणार आहे. - आदित्य दाभाडे मंडल अधिकारी