कामगारांच्या खासगी लसीकरणासाठी कंपन्यांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST2021-06-20T04:18:04+5:302021-06-20T04:18:04+5:30

कागल : केंद्र सरकार एकूण लसीपैकी २५ टक्के लस खासगी दवाखान्यांना देणार आहे. सहकारी संस्था, कंपन्या, बँका ...

Companies should take initiative for private vaccination of workers | कामगारांच्या खासगी लसीकरणासाठी कंपन्यांनी पुढाकार घ्यावा

कामगारांच्या खासगी लसीकरणासाठी कंपन्यांनी पुढाकार घ्यावा

कागल : केंद्र सरकार एकूण लसीपैकी २५ टक्के लस खासगी दवाखान्यांना देणार आहे. सहकारी संस्था, कंपन्या, बँका व साखर कारखाने अशा आस्थापनांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे पैसे स्वतःहून घालून खासगी दवाखान्यांमधून लसीकरण करून घ्यावे. ज्यामुळे शासकीय लसीकरणावरील ताण कमी होईल, एकूणच सर्वांचे वेळेत लसीकरण होईल, असे प्रतिपादन ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कागल मधील डी. आर. माने महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा बॅंकेचे संचालक भय्या माने, प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पाटील, मुख्याधिकारी पंडित पाटील, हेमंत निकम, कागल कोविड केअरचे डॉ. अभिजित शिंदे यांनी विभागाचा सविस्तर आढावा सादर केला.

तालुक्यातील करंजिवणे, म्हाकवे, लिंगनूर, कसबा सांगाव, मौजे सांगाव, सुळकूड, वंदूर, आनूर, बोरवडे, सावर्डे बुद्रुक, सोनाळी, गोरंबे, पिंपळगाव बुद्रूक, सेनापती कापशी, वडगाव, शेंडूर, बाचणी या गावांमध्ये रुग्णांची संख्या जास्त असल्याचे तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, या सर्व गावांमध्ये बाधितांची संख्या वाढली तरी चालेल, पण रोज दोन हजारांहून अधिक टेस्टिंग करा. औषध पुरवठा व सोयीसुविधा उपलब्ध कमी पडू देणार नाही.

चौकट महत्त्वाची

लसीकरण न झाल्यामुळेच घात झाला

कागलमधील सुरेश ऊर्फ भगवान मधुकर कांबळे (वय ४६) तरुण कार्यकर्त्याच्या मृत्यूमुळे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ अस्वस्थ झाले. शुक्रवारी कांबळे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्याने कोरोना प्रतिबंधक लसच घेतली नाही. त्यामुळेच त्याचा घात झाला. म्हणून रुग्ण जास्त दिसले तर चालतील, पण गावागावांत चाचण्या सुरू करा, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले.

कृपया मंत्री मुश्रीफ यांचा सिंगल फोटो वापरणे.

Web Title: Companies should take initiative for private vaccination of workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.